नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यू प्रकरणात नवा गौप्यस्फोट

सामना प्रतिनिधी । लातूर

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम असून या महान राष्ट्रभक्त नेत्याचा मृत्यू कथित विमान अपघातात झालाच नव्हता, अशा उलगडा पत्रकार अनुज धर यांनी केला. त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्याऐवजी काँग्रेसने त्यांच्या कुटुंबियांची हेरगिरी करण्यास प्राधान्य दिले. हे अत्यंत लज्जास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. लातूर येथील स्वामी विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने दयानंद सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

नेताजींच्या कथित विमान अपघातातील मृत्यूबद्दल कशा प्रकारे खोटे दाखले, पुरावे देण्याचा प्रयत्न तत्कालीन काँग्रेस सरकारकडून करण्यात आला याचा उहापोह त्यांनी आवश्यक त्या पुराव्यांसह केला. आपल्या देशात जोपर्यंत काँग्रेस शासित सरकार होते तोपर्यंत नेताजींच्या मृत्यूसंबंधीची कागदपत्रं सार्वजनिक केले गेले नव्हते. नेताजींचा विषय दडपण्यामागे तत्कालीन सरकार बरोबरच यंत्रणांचाही हात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सन २००५ साली माहिती अधिकार कायदा संमत झाल्यानंतर आपण गृहमंत्रालयाकडे नेताजींच्या संदर्भातील दस्तावेजाची मागणी केल्याचे सांगून सरकारी फाईल्समध्ये जे लिहिलेले असते, ते त्यावेळच्या सरकारच्या म्हणण्याप्रमाणे नोंदले गेलेले असते. म्हणजेच या दस्तावेजातील सर्व बाबी, मुद्दे वास्तव, खरे असतीलच असे नसते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, जेव्हा जेव्हा देशात काँग्रेसेतर सरकारे आली तेव्हाच नेताजींच्या प्रकरणाला गती मिळाली. परंतु केंद्रातील विद्यमान मोदी सरकारकडूनही या प्रकरणाला म्हणावी तेवढी गती मिळाली नसल्याची खंतही धर यांनी व्यक्त केली.

नेताजींच्या मृत्यूबद्दल अनेक सुरस कथा रचल्या गेल्या. याबाबतचे दस्तावेज वेळीच बाहेर आले असते तर त्यावर चांगले रहस्यमय चित्रपट निर्माण होऊ शकले असते. काहींच्या मते नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ ला विमान अपघातात झाला. काहींच्या मते पंडित नेहरूंच्या सांगण्यावरून रशियात स्टॅलिनने नेताजींना मारले. यात फारसे असे तथ्य नाही. १६ ऑगस्ट १९४५ ला नेताजी विमानाने सिंगापूरला गेले. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी सामान वाहून नेणाऱ्या विमानातून टोकियोकडे निघाले. त्यावेळी हबीब-उर-रहमान हा विश्वासू सहकारी त्यांच्यासोबत होता. या विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ही बाब माध्यमांसमोर हबीब-उर-रहमान सांगायचा. मात्र खाजगीत तो या गोष्टीचा इन्कार करायचा.

नेताजींच्या मृत्यूची चौकशी २० जून १९४६ ला अमेरिकेने प्रथम सुरू केल्याचे धर यांनी सांगितले. त्यात नेताजींच्या कथित विमान अपघातातील मृत्यूची कथा जपानी नेत्यांच्या सांगण्यावरून रचली गेल्याचे निदर्शनास आले. या महान क्रांतिकारी नेत्याचा विमान अपघातात जेथे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते, त्या ठिकाणी कोणताही अपघात झाला नव्हता , असे तैवान सरकारचे म्हणणे असल्याचेही धर यांनी पुराव्यासकट उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. पंडित नेहरूंनी नेताजी व त्यांच्या पूर्ण परिवारांसह नेताजींच्या निकटवर्तीयांवर गुप्तहेरांमार्फत नजर ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नेताजींच्या अस्थींची खोटी डीएनए चाचणी करण्यात आल्याचा गौप्यस्फोटही धर यांनी केला. १९५३ मध्ये चीनच्या दिशेने नेताजी हिंदुस्थानात आले.

नेताजी सुभाषचंद्र बोस १९८५ पर्यंत जीवित होते व ते उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे गुमनामी बाबा, भगवानजी म्हणून वास्तव्य करत होते. मात्र ते कधीही कोणाच्या दृष्टीस पडले नाहीत. त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करणाऱ्या न्या. मुखर्जी यांनीही खाजगीत भगवानजी, गुमनामी बाबा म्हणजेच नेताजी असल्याचे मान्य  केले होते. गुमनामी बाबांच्या साहित्यात नेताजींच्या कुटुंबियांचे फोटो आढळून आले होते. हे गुमनामी बाबा अस्खलित इंग्रजी बोलत असत. त्यांचे हस्ताक्षर नेताजींच्या हस्ताक्षरांशी तंतोतंत जुळले होते. यावरून गुमनामी बाबा म्हणजेच नेताजी होते व त्यांचा मृत्यू कथित विमान अपघातात झाला नव्हता याला पुष्टी मिळते, असेही धर यांनी स्पष्ट केले.