NETFLIX

अमित घोडेकर,[email protected]

मोबाईलवर चित्रपट आणि वेब सीरिज सध्या मोठय़ा प्रमाणात देण्याचं काम नेटफ्लिक्स करते आहे

आजचं जग आहे ऑनलाइनचं आणि आजच्या पिढीला सगळं काही ऑनलाइन हवं असतं. मग ते क्रिकेटचा सामना असो नाहीतर ताज्या घडामोडी असोत, या ऑनलाइनमागचं खरं कारण मोबाईल आहे. सगळं काही मोबाईल झालं आहे. त्यामुळे मग सगळं काही बघण्यासाठी कशाला पाहिजे झंझट! मोबाईलबरोबर असला की, सगळी कामं होतात. या मोबाईलवरच आजकाल आपण बराच वेळ खर्च करतो. मग यात मनोरंजन तरी कसे मागे राहील? त्यामुळेच की काय? आजकाल टीव्हीप्रमाणेच मोबाईलवरच चांगल्या चांगल्या सीरियल्स येऊ लागल्या आहेत, ज्यांना वेब सीरिज असे म्हणतात. या वेब सीरिज एकदा नेटवर्क असेल तेव्हा डाऊनलोड करून ठेवायच्या आणि मग कधीही बघत बसायच्या. म्हणजे अगदी ट्रेनमध्ये किंवा विमानात कधीही. असंच काहीसं चित्रपटांचंदेखील. कधीही कुठेही कोणताही चित्रपट बघायचा असेल तर आजकाल मोबाईलवर सहज शक्य आहे. मोबाईलवर चित्रपट आणि वेब सीरिज सध्या मोठय़ा प्रमाणात देण्याचं काम नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन प्राईम आणि त्यानंतर काही प्रमाणात यू टय़ूब आणि व्हूटवर होते, पण या सगळ्यांची सुरुवात नेटफ्लिक्सने केली आणि नेटफ्लिक्सच आज या सगळ्यात आघाडीवर आहे.

१९९७ साली रीड हास्टिग आणि मार्क रेन्डॉल्फ या दोघांनी मिळून एक ऑनलाइन डीव्हीडी भाडय़ावर देणारी कंपनी काढली. नेटफ्लिक्स कशी स्थापन झाली याची अनेकदा एक सुरस गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे रीड हास्टिगने एकदा एका दुकानातून ‘अपोलो १३’ या त्या काळी खूप गाजलेल्या चित्रपटाची डीव्हीडी भाडय़ाने घेतली होती आणि त्याला ती वेळेवर देता आली नाही. त्यामुळे दुकानदाराने त्याला ४० डॉलरचा दंड केला. रीड हास्टिग त्या वेळेस काही कामानिमित्त प्रवास करत होता. त्यामुळे भाडय़ाने घेतलेली डीव्हीडी त्याला वेळेत परत करता आली नाही. पुढे मग डीव्हीडी भाडय़ाने घेण्यासाठी आणि परत जाण्यासाठी दुकानात जाण्यापेक्षा सरळ ती ऑनलाइनच दिली तर किती बरं होईल हा विचार करून रीड हास्टिग आणि मार्क रेन्डॉल्फने मिळून नेटफ्लिक्सची स्थापना केली. रीड हास्टिगला एक गोष्ट पक्की माहीत होती की, डीव्हीडी हेच जगाचं भविष्य आहे आणि आपला हा व्यवसाय नक्कीच चालेल, पण त्या काळी त्यांच्या पुढचा खूप मोठा प्रश्न असा होता की, अमेरिकेत डीव्हीडी वापरणारे लोक खूपच कमी होते. मग फक्त ऑनलाइन डीव्हीडी भाडय़ाने देऊन काही फायदा नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी संगणक विकणाऱया अनेक कंपन्याबरोबर करार करून संगणकात डीव्हीडी प्लेयर बसवायला सुरुवात केली. त्यासाठी मग नेटफ्लिक्स काही महिने फुकटात डीव्हीडी देत असे. हा व्यावसायिक मंत्र चांगलाच यशस्वी झाला आणि नेटफ्लिक्स अमेरिकेतील एक चांगला प्रस्थापित व्यवसाय म्हणून उदयाला आला.

नेटफ्लिक्स ही घोडदौड लवकरच थांबली. कारण अमेरिकेतील सगळ्यात मोठय़ा ऑनलाइन शॉपिंगचे संकेतस्थळ असलेल्या ऍमेझोननेही डीव्हीडी देण्यास सुरुवात केली आणि मग नेटफ्लिक्सला आपल्या व्यवसायात काहीतरी नवीन करावं लागणार याची कल्पना आली. मग अजून एका भन्नाट कल्पनेचा जन्म झाला तो म्हणजे थेट चित्रपट निर्मिती करणाऱया कंपन्यांशी संधान बांधायचे आणि येणाऱया कोणत्याही चित्रपटाच्या डीव्हीडी फक्त नेटफ्लिक्सवर काही दिवसांनंतर मिळणार याची सोय करायची. ही योजना कमालीची यशस्वी झाली आणि नेटफ्लिक्सचं नाव घरोघरी पोहोचलं. पुढे मग इंटरनेटचं जग खूप मोठं झालं. आजकाल नेटफ्लिक्सच अनेक चित्रपट आणि वेब सीरिज फक्त स्वतःच्या ग्राहकासाठी बनवते. म्हणजेच ते चित्रपट फक्त नेटफ्लिक्सवरच दिसतात. गेल्या काही वर्षांत नेटफ्लिक्सने अनेक चित्रपट, वेब सीरिज बनवल्या आहेत.