आजाराची लक्षणे, आजारपणातील काळजी एका क्लिकवर

सामना ऑनलाईन, मुंबई

पावसाळ्यातील साथीच्या आजारांसाठी पालिकेने एका बाजूला वैद्यकीय शिबिरे आयोजित केलेली असताना दुसरीकडे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पावसाळी आजारांची माहिती देणारे मोबाईल ऍप तयार केले आहे. आजारांची लक्षणे, आजार होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी अशी सर्व माहिती या ऍपवर मिळू शकणार आहे. ‘मान्सून रिलेटेड डिसीज’ असे या ऍपचे नाव असून त्याचे उद्या लोकार्पण होणार आहे

डेंग्यू, मलेरिया (हिवताप), एच१एन१ (स्वाइन फ्लू), लेप्टोस्पायरोसिस, चिकुनगुनिया यासारख्या पावसाळी आजारांबाबत इंटरनेटवर खूप माहिती उपलब्ध असली तरी शास्त्रसुद्ध माहिती सर्वसामान्यांना सहजपणे उपलब्ध व्हावी या उद्देशाने पालिकेच्या आरोग्य विभागाने एक विशेष ऍण्ड्रॉईड ऍप तयार करण्यात आले आहे. पालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील ‘सामुदायिक औषध विभाग’ व कांदिवली परिसरातील ‘ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ यांच्या सहकार्याने हे ऍप तयार करण्यात आले आहे. ‘मान्सून रिलेटेड डिसीज’ या नावाचे हे ऍप मोफत उपलब्ध असून यामध्ये पावसाळी आजारांबद्दलची माहिती, आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, आजार झाल्यास काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. तसेच महापालिका क्षेत्रात महापालिकेचे दवाखाने व रुग्णालये यांचे संपर्क क्रमांक / पत्ते देखील देण्यात आले आहेत. या ऍपचे औपचारिक लोकार्पण महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते उद्या मंगळवार, दि. १९ सप्टेंबर २०१७ रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती प्रा. डॉ. सीमा बनसोडे – गोखे यांनी दिली आहे. हे ऍप ‘गुगल प्ले स्टोअर’वर मोफत उपलब्ध आहे. मंगळवारी शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात आयोजित होणाऱया ’निरंतर वैद्यकीय शिक्षण’ कार्यक्रमादरम्यान या ऍपचे औपचारिक लोकार्पण करण्यात येणार आहे अशीही माहिती डॉ. बनसोडे-गोखे यांनी दिली आहे.