कर्नाटकात ‘लिटिल कुमारस्वामी’ची चर्चा, महिला पोलिसाने दिले जीवदान

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्नाटकमध्ये सध्या नव्या कुमारस्वामींची चर्चा आहे. ही चर्चा राज्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची नाही तर जन्मताच आई-वडिलांनी कचऱ्यामध्ये फेकून दिलेल्या आणि एका महिला पोलिसांने आपले दूध पाजून जीवदान दिलेल्या ‘लिटिल कुमारस्वामी’ची आहे.

बंगळुरूतील एका भागामध्ये आई-वडिलांनी आपल्या चिमुरड्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले. कचरा साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे बाळ दिसले. सफाई कर्मचाऱ्यांनी याची माहिती शेजारीच असलेल्या एका दुकानदाराला दिली आणि नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बाळाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बांधकामप्रवण इमारतीजवळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून बाळाला फेकून दिले होते. बाळाच्या गळ्याला नाळेचा विळखा पडलेला होता. पोलिसांनी बाळाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर बाळ एकदम ठणठणीत झाले. परंतु आता बाळाला ठेवायचे कुठे आणि कोणाकडे हा प्रश्न निर्माण झाला. पण पोलीस स्थानकातील एका महिला पोलिसानेच या बाळाला पदराखाली घेतले आणि आईचे प्रेम दिले. पोलिसांनी या बाळाचे नाव ‘लिटिल कुमारस्वामी’ असे ठेवले आहे.