नववधूने प्रियकराच्या मदतीने सासरच्यांवर केला विषप्रयोग, १३ जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद

घरच्यांनी मनाविरुध्द निकाह लावून दिल्याने रागाच्या भरात एका नववधूने सासरच्यांवर विषप्रयोग केला, यामध्ये घरातल्या १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जण अत्यवस्थ असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ही घटना पाकिस्तानमधील  इस्लामाबाद येथे घडली आहे. आयेशा असे या नववधूचे नाव असून प्रियकराच्या मदतीने तिने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

आयेशाचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. पण घरच्यांचा त्यास विरोध होता. यामुळे मुज्जफ्फरगढ येथे राहणाऱ्या अमजद नावाच्या तरुणाशी घरच्यांनी तिचा जबरदस्तीने निकाह लावून दिला. लग्नानंतर आयेशा प्रियकराला विसरेल असे तिच्या घरच्यांना वाटत होते. पण आयेशा प्रियकराला भेटण्याच्या प्रयत्नात होती. घरातल्यांशी ती नीट बोलत नसल्याने अमजदने तिला याबदद्ल जाब विचारला. यावर हा निकाह माझ्या मनाविरुध्द झाल्याचे आयेशाने त्याला सांगितले. यामुळे चिडलेल्या अमजदने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपास गेल्याने आयेशा सासर सोडून माहेरी आली होती.

निकाहच्या सहा दिवसातच मुलगी परतल्याचे बघून तिच्या माहेरच्यांनी तिला परत सासरी जायला सांगितले. यामुळे चिडलेल्या आयेशाने अमजदचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने आपल्या प्रियकराकडे मदत मागितली. त्यानंतर ती अमजदशी चांगली वागू लागली. तिच्यात झालेला बदल बघून अमजदला आश्चर्य वाटले पण तरीही यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याचा त्याला संशय होता. यामुळे तो तिच्याशी फटकून वागत होता. पण सुनेच्या वर्तनात झालेला बदल बघून सासरची मंडळी मात्र सुखावली होती.

गुरुवारी आयेशाने सकाळीच अमजदला विष घातलेले दूध प्यायला दिले, अमजदने ते प्यायले नाही. यामुळे आयेशाने हे दूध पातेल्यात ओतून ठेवले होते. अमजदने दूध पिण्यास नकार दिल्याने आयेशा हिरमुसल्याचे बघून सासूने त्या दूधाची लस्सी बनवली व घरातल्यांबरोबरच शेजाऱ्यांनाही प्यायला दिली. पण लस्सी पिताच २७ जणांना त्रास व्हायला लागला. या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी लस्सीतून सगळ्यांनाच विषबाधा झाल्याचे समोर आले.