परळ-एल्फिन्स्टनचा नवा पूल मार्च-एप्रिलपर्यंत पूर्ण होणार

सामना ऑनलाईन । मुंबई

परळ-एल्फिन्स्टन रोड येथील नव्या १२ मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या उभारणीने वेग घेतला असून त्याची निर्मिती येत्या मार्च-एप्रिल २०१८ पर्यंत होणार आहे. एल्फिन्स्टन रोड येथील अपघातानंतर परळ-एल्फिन्स्टन रोडच्या अरुंद पुलाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. परळ स्थानकात दादरच्या दिशेकडील पादचारी पुलाचा विस्तार करण्यात येणार आहे. पश्चिमेकडील फुलमार्केटकडे त्याचा पोहच रस्ता उतरविण्यात येणार आहे. तसेच सध्याच्या दोन्ही स्थानकांना जोडणाऱया पादचारी पुलाचेही रुंदीकरण होणार आहे. शिवाय रेल्वेने त्याच दिवशी २९ सप्टेंबर रोजी टेंडर काढलेल्या परळच्या नव्या १२ मीटर रुंदीच्या पुलाचे बांधकाम परळ स्थानकातील जुन्या पादचारी पुलाच्या समांतर होणार असून त्याचे टेंडर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खुले होणार आहे.

परळमध्ये एकूण तीन पादचारी पूल
टेंडर मंजूर झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या नवीन १२ मीटरच्या पादचारी पुलाचे बांधकाम मार्च-एप्रिल २०१८ अखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी दिली. परळ स्थानकावर दादरच्या दिशेकडील उत्तर पुलाचा विस्तार फुलमार्केटकडे पश्चिमेकडे होणार असून लष्कराच्या मदतीने त्याचे काम होणार आहे. त्यामुळे परळ स्थानकात पादचारी पुलांची संख्या एकूण तीन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.