सोनी मराठीचं छोट्या पडद्यावर पदार्पण

सामना ऑनलाईन । मुंबई

सोनी मराठी ह्या नवीन वाहिनीच्या माध्यमातून Sony Pictures Networks India (SPN) मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे. आजच्या काळाला अनुरूप असे विषय घेऊन येणारी ही नवीन वाहिनी येत्या १९ ऑगस्टला घराघरांत पोहोचणार असून मराठी भाषक श्रोत्यांसाठी सबंध कुटुंबानं एकत्रित पाहण्याजोगे कलाविष्कार सादर करणार आहे. आशयघन मालिकांच्या माध्यमातून ‘विणूया अतूट नाती’ ह्या आपल्या मूळ विचाराशी एकनिष्ठ राहत Sony मराठीचा मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी अतूट नाती विणण्याचा प्रयत्न असेल.

वैविध्यपूर्ण कथा आणि भक्कम विषयमांडणी असलेल्या ९ कथा मालिका (Fiction) आणि २ कथाबाह्य कार्यक्रम (Non-Fiction) सोनी मराठी सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांना सुपूर्द करेल. कथा मालिकांमध्ये ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘ह.म.बने तु.म.बने’, ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘ती फुलराणी’, ‘दुनियादारी फिल्मी इष्टाईल’, ‘Year Down’, ‘भेटी लागी जीवा’, ‘हृदयात वाजे Something’, ‘गर्जा महाराष्ट्र’ह्यांचा समावेश आहे. तसेच ‘महाराष्ट्राचा Favorite Dancer’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हे कार्यक्रमही प्रेक्षकांसाठी सोनी घेऊन येत आहे . १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ५५व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार भव्य सोहळ्याच्या प्रक्षेपणाचे औचित्य साधून सोनी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.