स्वागत दिवाळी अंकांचे – ४

साहित्य संस्कृती

‘साहित्य संस्कृती २०१७’ हा दिवाळी अंक यंदा पर्यावरण विशेषांक घेऊन आला आहे. अंकाचे मुखपृष्ठ पर्यावरणावर         प्रकाशझोत टाकणारे आहे. यामध्ये डॉ. उमेश मुंडल्ये यांचा ‘देवराई’ लेख, विनायक(दिलीप)जोशी यांचा ‘पर्यावरण आणि आपण’ हे लेख माहितीपूर्ण आहे. अपूर्वा वैद्य यांचा ‘सत्यमेव जयते’ हा लेख वाचनीय आहे तर डॉ. कांचन गंधे लिखित ‘वनस्पती’, डॉ. अभय देशपांडे यांचा ‘प्रकाश’, डॉ. महेश गायकवाड यांनी लिहिलेला ‘निसर्ग’ इत्यादी लेख आहेत. प्रदीप पाताडे यांचा ‘मुंबई’ हा लेख सागरी जैवविविधतेचा आढावा घेणारा आहे. गीतांजली साठे यांचा ‘शाश्वत संवर्धनाचे मानकरी’, रिंकू यांचा ‘प…पर्यावरणाचा’, वर्णिका काकडे यांचा ‘शून्य कचरा अभियान’, अमित घोडेकर यांचा ‘ई-कचऱयाचे वास्तव’ हे लेख सखोल माहिती देणारे आहेत. याबरोबरच भरत जोशी, जे. डी. पराडकर, तृप्ती घोटगाळकर, ऍड.गिरीष राऊत यांचे लेख माहितीपर आहेत.

संपादिका वंदना नाईक

मूल्य ७५ रु.,  पृष्ठ ९६

लीलाई

या अंकात साहित्यांतील सर्व प्रकार नामवंतांच्या सिद्धहस्त लेखणीतून वाचकांना आनंद देणारे ठरले आहेत. याकरिता गंगाराम गवाणकर, प्रतिभा सराफ, जोसेफ मुस्कानो, पु. द. कोडोलीकर, स्टॅन्ली गोन्सालविस, चंद्रशेखर धर्माधिकारी आदी मान्यवरांचे लेख/कथा वाचनीय आहेत. नाटक हा मराठी माणसाचा आणखी एक जिव्हाळय़ाचा विषय. यातून राज्य नाटय़ स्पर्धेची चळवळ उभी राहिली. या चळवळीविषयी विजय केंकरे, यतीन माझिरे, श्रीपाद जोशी यांची मते वाचकांना वेगळा दृष्टिकोन देणारी ठरली आहेत. अरुण मराठे यांचे वॉटर कलर लॅण्डस्केपचे मुखपृष्ठ लक्षवेधी.

संपादिका पूजा अनिलराज रोकडे

मूल्य १६०रु., पृष्ठ १८८

पासवर्ड

‘डोकेबाज मुलांसाठी भन्नाट खुराक’ ही या अंकाची टॅगलाइन आहे. शिवाय आदीमानवाची गोष्ट, शेरलॉक ओम्स, पारध्याची पोर, टिल्लू गँग, मुलगी अशा पाच कथा तसेच शिनीची होशी या जपानी लेखकाची अनुवादित कथा या अंकात आहेत. अनिल अवचट यांनी आपल्या खास शैलीत भाषेच्या गमतीजमती सांगितल्या आहेत. दिलीप सुभेदार आणि मेघश्री दळवी यांच्या विज्ञानकथा आहेत. जंगलातील पाणवठा, हिमालयातील अद्भुत गाव, अनोखी वाद्यजत्रा, वायुसेनेचे बंद पडलेले विमान कमीत कमी दिवसांत सुरू करण्याचा थरारक अनुभवही अंकात आहे. विविध प्रकारच्या शंखशिंपल्यांची आणि पर्यावरणाशी संबंधित नाणी व नोटांची माहितीही या विभागात आहे.

संपादक सुहास कुलकर्णी/आनंद अवधानी

मूल्य १००रु., पृष्ठ ९६

मनशक्ती

या अंकात नेहमीच्या परंपरेप्रमाणे सकस, बौद्धिक, तात्त्विक साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामी विज्ञानानंदांच्या अप्रकाशित लेखांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. शिवाय भागीदारी- मानवी मनाची आणि नमानवी बुद्धिमंतांची (विवेक सावंत), आधुनिक तंत्रज्ञानाची दुसरी बाजू (अतुल कहाते), बहुविध बुद्धिमत्ता (गजानन केळकर), ज्ञानगुणाकार आणि कार्यविकास (प्रमोदभाई शिंदे), व्यक्तींच्या वेव्हलेंग्थचे स्वरूप (रा. ग. कदम) हे लेख नवी दिशा दाखवणारे आहेत.

संपादक श्रीहरी कानपिळे

देणगीमूल्य १२०रु., पृष्ठ १९४

महानगरी वार्ताहर

या अंकाचा विषय ‘कुलदेवता’ आहे. त्याच्याशी संबंधित उपयुक्त, वाचनीय व संग्राह्य लेखांचा समावेश अंकात आहे. यात महाराष्ट्र व देशभरातील प्रमुख कुलदेवी व कुलदेवता यांच्या माहितीसह कुलदेवतेचे दर्शन कसे घ्यावे, कुलधर्म – कुळाचार म्हणजे काय, यासारखे लेख आहेत. विविध व्याधींसाठी देवीचे मंत्र, देवी कवच, स्तोत्रे, मंदिराचा जीर्णोद्धार आदी विषयांचाही समावेश आहे. याशिवाय ६५च्या वर कुलदेवतांची सचित्र माहितीही अंकात दिली आहे. मान्यवर लेखकांच्या आपापल्या कुलदेवतेविषयीच्या भावना-अनुभव यांचा समावेश अंकात आहे.

संपादक सतीश सिन्नरकर

मूल्य २०० रु., पृष्ठ २००