ज्वलंत विषयावर भाष्य करणारे नाटक ‘मी.. माझे.. मला’ लवकच रंगभूमीवर


सामना ऑनलाईन । मुंबई

स्वतःपलीकडेही एक विश्व असते, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते. बदलत्या काळात समाजात स्वयंकेंद्रित वृत्ती वाढीस लागल्याचे आढळून येत आहे. हे चित्र कदाचित पुढे मोठे होत जाईल, अशी एक धास्तीही वाटते. अशावेळी या वृत्तीच्या पलीकडे जाऊन विचार करणे गरजेचे असते. यावर भाष्य करणारे ‘मी.. माझे.. मला’ हे नवीन नाटक आता रंगभूमीवर येत आहे.

किशोर सावंत आणि विवेक नाईक यांच्या ‘किवी प्रॉडक्शन्स’ या नाट्यसंस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाचे लेखन आनंद म्हसवेकर यांनी केले असून, विजय गोखले यांनी दिग्दर्शन केले आहे. विघ्नेश जोशी, विजय गोखले, किशोर सावंत, विलास गुर्जर, सुरेखा कुडची, हेमांगी राव आणि रोहित मोहिते यांच्या या नाटकात भूमिका आहेत. अनिकेत शुभम यांचे संगीत, देवाशिष भरवडे यांचे नेपथ्य, अमोघ फडके यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. या नाटकाचे व्यवस्थापन प्रवीण दळवी सांभाळत आहेत. 21 एप्रिल रोजी ‘मी.. माझे.. मला’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे.

सध्याच्या काळात माणूस केवळ स्वतःचाच विचार करू लागला आहे. ज्यांनी आपल्याला वाढवले त्या पालकांविषयी काही जबाबदारी नाही का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पंख फुटलेल्या मुलांचे त्यांच्या आई-वडिलांविषयी काही कर्तव्य आहे की नाही? हे सर्व मांडण्यासाठी नाटकासारखे उत्तम व्यासपीठ नाही. नाटकाचा विषय मला खूप भावला आणि म्हणून मी हे नाटक दिग्दर्शित करायचे नक्की केले, असे मत दिग्दर्शक विजय गोखले याबाबत व्यक्त करतात. एक ज्वलंत सामाजिक विषय घेऊन मी हे नाटक लिहिले आहे. हा विषय समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे वाटते. किशोर सावंत यांच्यासारखे निर्माते व विजय गोखले यांच्यासारखे दिग्दर्शक या नाटकाला लाभल्याने हा विषय व्यवस्थितपणे समाजापर्यंत पोहोचेल याची मला खात्री आहे, असे मनोगत लेखक आनंद म्हसवेकर मांडतात.

भावनेच्या आहारी न जाता प्रॅक्टिकल निर्णय घेणारे पात्र मी यात साकारतोय. हे पात्र सतत वास्तवाला धरून चालत असले तरी ही व्यक्तिरेखा स्वार्थी प्रवृत्तीची नाही. ही वेगळी भूमिका आहे आणि ती साकारताना मला आनंद मिळतोय, असे अभिनेते विघ्नेश जोशी त्यांच्या भूमिकेविषयी बोलताना स्पष्ट करतात. मी पडद्यावर भरपूर निगेटिव्ह भूमिका केल्या आहेत. मात्र माझी ही परंपरा या नाटकातल्या भूमिकेमुळे मोडीत निघाली आहे. कारण यात मी सरळ-साध्या गृहिणीची भूमिका रंगवत आहे. एक चांगले आणि पॉझिटिव्ह पात्र मला यात साकारता येत असल्याने ही भूमिका करताना मला समाधान वाटत आहे, असे भाष्य अभिनेत्री सुरेखा कुडची याविषयी करतात.

मी आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका नाटकांतून केल्या असल्या, तरी या नाटकाच्या निमिताने मला आनंद म्हसवेकर यांचे नाटक करायला मिळत आहे. नाटकाची भाषा अतिशय साधी, परंतु परिणामकारक आहे. यातले संवाद मनाचा ठाव घेणारे आहेत. या भाषेमुळे आम्हा सर्व कलाकारांना संवाद पाठ करताना अडचण आली नाही; हे श्रेय लेखकाला जाते, असे या नाटकाविषयी बोलताना ज्येष्ठ अभिनेते विलास गुर्जर स्पष्ट करतात.