नवे नवे Emojis


अमित घोडेकर,[email protected]

इमोजीमध्ये काही अस्सल हिंदुस्थानी वस्तू स्थान मिळवणार आहेत, ज्या जवळपास 55च्या घरात आहेत. आपली आवडती रिक्षा, हिंदुस्थानी महिलांची आवडती साडी, आपल्या श्रद्धेचे प्रतीक मंदिर यापासून ते अगदी आपल्या घराचे रक्षण करणारा कुत्रा असे अनेक नवीन इमोजी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी येणार आहेत.

अगदी वर्षभरापूर्वी बहुतांशी सगळ्या गोष्टी फेसबुकवर टाकल्या जात असत. आता मात्र बऱयाचशा संभाषणाची सुरुवात व्हॉटस् अॅपवरून होते. त्याचे कारण आपला मोबाईल सदैव आपल्या बरोबर असतो. आपला मोबाईलच खरे तर आपला सगळ्यात चांगला मित्र झालाय असे म्हणायला काहीही हरकत नाही. कारण आजकाल प्रत्येक प्रसंगात तो आपल्याकडे हजर असतो. त्यामुळे सगळ्या गोष्टींची सुरुवात मोबाईलवरूनच होते. अगदी आपली सकाळ पण मोबाईलमधले व्हॉटस् अॅपवरचे ‘गुड मॉर्निंग’ मेसेज बघून होते आणि रात्र ‘गुड नाईट’चे मेसेज टाकून होते. एकंदरीत काय, आपला मोबाईल आपल्याला सगळ्यात जास्त ओळखत असेल. त्यामुळेच मग आपल्या भावना आणि आपली मानसिक स्थिती कदाचित आपले आईवडील, भाऊबहीण किंवा मित्रापेक्षा पण सगळ्यात चांगल्या प्रकारे कदाचित आपल्या मोबाईललाच माहीत असेल आणि ही स्थिती शोधायची सगळ्यात चांगली जागा म्हणजे मोबाईलवरचे डीपी, स्टेटस आणि मोबाईलवर संभाषण करत असताना पाठवले जाणारे इमोजी.

अजून एक गोष्ट सगळीकडे धुमाकूळ घालत आहे आणि ती म्हणजे इमोजी किंवा सिमिलीस. इमोजी म्हणजे फक्त एक कार्टून किंवा चित्रातून तुमच्या मनातले भाव झटपट कळवणे. आजकाल स्टिकर्स नावाचा एक नवीन प्रकारदेखील आला आहे, ज्यात अनेक नवीन वेगळे मेसेज पाठवता येतात. इमोजीची सुरुवात पण बऱयाच अगोदर म्हणजे 1990 च्या दशकात सुरू झाली होती. त्यानंतर याहू मेसेंजरमध्ये याचा खूप मोठय़ा प्रमाणात वापर सुरू झाला आणि त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मग नंतर मोबाईलमधल्या मेसेजेसमध्येदेखील त्याचा शिरकाव सुरू झाला, पण खऱया अर्थाने इमोजीला लोकप्रियता मिळवून दिली ती परत एकदा व्हॉटस् अॅपनेच. याहूमध्ये बरीच वर्षे काम केल्यावर जेव्हा ज्यॅन कुमलाने व्हॉटस् अॅप सुरू केले तेव्हा त्याने ठरवलंच होतं की, व्हॉटस् अॅपमधले इमोजी हे जगातील सगळ्यात चांगले इमोजी असतील आणि खरंच, व्हॉटस् अॅपमधले इमोजी हे आपल्या मनातील भाव प्रकट करण्याचे एक छान माध्यम आहे.

आजकाल इमोजीचा वापर फक्त व्हॉटस् अॅपमध्ये नाहीतर जवळपास सगळीकडेच होत असतो. उदा. फेसबुक, एसेमेस इत्यादी आणि सध्या इमोजीमध्ये अक्षरशः हजारो इमोजी आहेत, ज्यांचा वापर करून आपण कुठल्याही शब्दाचा वापर न करता आपल्या भावना प्रकट करू शकतो. या इमोजी सगळीकडे सारख्याच असाव्यात यासाठी एक वेगळी संस्था काम करत आहे, जिचे नाव युनिकोड कन्सोर्टियम आहे. ही संस्था वेळोवेळी नवनवीन इमोजी आपल्या मोबाईलमध्ये घेऊन येत असते. काही वर्षांपूर्वी आलेला आपला तिरंगा असो किंवा क्रिकेटचा बॅटबॉल असो, हे सगळे इमोजी युनिकोड कन्सोर्टियम आणत असते. आता या वेळेस इमोजीमध्ये काही अस्सल हिंदुस्थानी वस्तू स्थान मिळवणार आहेत, ज्या जवळपास 55च्या घरात आहेत. रिक्षा, साडी, मंदिर ते अगदी आपल्या घराचे रक्षण करणारा कुत्रा असे अनेक नवीन इमोजी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी येणार आहेत.

इथून पुढे व्हॉटस् अॅपवर आलेले आपले सगळे फोटो आणि व्हिडीओ आता थेट गुगलवर साठवले जाणार आहेत. त्यासाठी गुगल व्हॉटस् अॅपसाठी खास वेगळी मेमरी देणार आहे, जी गुगलवरून आपल्याला मिळणाऱ्या 15 जीबी मेमरीच्या व्यतिरिक्त असावी लागेल. या सोयीमुळे आपल्याला आपल्या व्हॉटस् अॅपवरील फोटो-व्हिडीओची काळजी करू नका. आपले सगळे फोटो किंवा व्हिडीओ गुगलवर साठवले जातील. फक्त त्यासाठी तुम्हाला तुमच्या व्हॉटस् अॅपवर चॅट बॅकअप नावाचे फिचर सुरू करावे लागेल.