शिवसेनेने दत्तक घेतलेल्या लिंबाळाच्या सौंदर्यात भर, भूकंपग्रस्त गावात साकारतेय स्मृती उद्यान


सामना प्रतिनिधी, औसा

30 सप्टेंबर 1993 च्या भूकंपानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लिंबाळा गाव दत्तक घेऊन गावचे पुनर्वसन केले. लिंबाळा दाऊ येथे साकारलेल्या स्मृती उद्यानामुळे आता या गावच्या सौंदर्यात भर पडली आहे.

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे दोन वर्षापूर्वी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी औसा येथील तहसील कार्यालयात भूकंपग्रस्तांच्या अडचणी जाणून घेऊन या भागातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. त्याचबरोबर उत्पादनयुक्त जर वृक्ष लावले गेले तर शासनालाही फायदा होईल आणि त्याचबरोबर याच भागात विविध प्रकारचे सुगंधी फुलांचीही लागवड करावी, अशा सूचना तत्कालीन तहसिलदार अहिल्या गाठाळ यांना केल्या होत्या. भूकंपग्रस्तांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्या संकल्पनेतून भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या गावातील दगड काढून जमिन लेव्हलिंग करून भूकंपग्रस्तांसाठी स्मृतिवन उद्यान उभारण्याची कल्पना सुचविली. सरकारच्या वनविभागामार्फत लिंबाळा (दाऊ) येथे 6 हेक्टर्स क्षेत्रावर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून जुन्या गावाला सुशोभित केले आहे.

नांदुर्गा येथेही स्मृती वनाची उभारणी करण्यात आली असून अनेक गावातील जुन्या गावठाणात हा प्रयोग सुरू आहे. लिंबाळा दाऊ येथील स्मृती उद्यानामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मोठ्या वृक्ष लागवडी सोबतच आकर्षक फुलांची झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. लिंबाळा (दाऊ) गावाचे पुनर्वसन शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे लिंबाळा (दाऊ) चे आज सगळीकडेच कौतूक होताना दिसत आहे. भूकंपग्रस्त भागातील स्मृतिवन उद्यान निर्मितीमुळे या परिसराच्या सौंदर्यातही भर पडत आहे. तसेच पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी उद्यानाची मदत होणार असून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.