डॉक्टरांवर आता थेट रुग्णांचाच वॉच, आरोग्य खात्याची नामी शक्कल

१०४ टोल क्रमांकावर थेट तक्रार करा, निष्क्रीय डॉक्टरांवर होणार तातडीने कारवाई

उदय जोशी । बीड

ग्रामीण भागामध्ये थाटलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे ओस पडत आहेत. नेमलेले डॉक्टर रुग्णालयाऐवजी बाहेर कोठेतरी भटकंती करताना आढळून येतात. रुग्णांवर उपचार वेळेवर होत नाहीत. बायोमेट्रीक पद्धत फेल ठरल्यानंतर आरोग्य खात्याने आता नामी शक्कल लढवली आहे. इमर्जन्सीच्या काळात रुग्णालयात डॉक्टर नसेल तर रुग्णाने १०४ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा. त्यासाठी पुण्यात कंट्रोल रूमही उभारण्यात आली आहे. कोणत्या डॉक्टरची डय़ूटी आहे, सध्या ते कोठे आहेत याची अवघ्या काही सेकंदात खातरजमा केली जाणार आहे. आरोग्य खात्याच्या या युक्तीने निष्क्रीय डॉक्टरांवर आता रुग्णांचाच वॉच राहणार आहे. कुचकामी डॉक्टरांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे.

ग्रामीण व शहरी भागामध्ये आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. कोटय़वधी रुपयांचा खर्च होऊनही रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. प्राथमिक उपचारासाठीही रुग्णालयामध्ये तिष्ठत बसावे लागते. शवविच्छेदन डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे वेळेवर होत नाही. जेव्हा रुग्ण प्राथमिक आरोग्य, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात जातात तेव्हा डॉक्टर तेथे उपस्थित नसतात. म्हणून रुग्णांना मोफत आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागते. डॉक्टरांनी रुग्णालयात थांबलेच पाहिजे यासाठी शासनाने अनेक उपाय करून पाहिले, मात्र डॉक्टरांनी पळवाटा शोधण्याचे काम केले. दैनंदिन हजेरी असो की बायोमेट्रीक पद्धत, या फेल ठरल्याने कामचुकार डॉक्टरांचे फावत आहे. यासाठी राज्याच्या आरोग्य खात्याने नामी शक्कल शोधली आहे.

शवविच्छेदन तात्काळ करायचे आहे, रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेला आहात, काहीतरी इमर्जन्सी आहे, महिलांची प्रसूती आहे, बाळ आजारी आहे आणि प्राथमिक किंवा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नाहीत, आरोग्याची सुविधा नाही, अशा वेळी रुग्णाने किंवा रुग्णाच्या नातेवाइकाने फक्त १०४ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा आणि आपली तक्रार नोंदवायचा हा कॉल पुण्यामध्ये उभारलेल्या कंट्रोल रुमला जाईल. तेथे २५ कर्मचारी चोवीस तास नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याजवळ राज्यातील सर्व ग्रामीण आणि प्राथमिक रुग्णालयातील डॉक्टरांचे नाव आणि संपर्क नंबर असेल. अवघ्या काही सेकंदांत संबंधित रुग्णालयामध्ये कोणाची डय़ूटी आहे, आणि ते सध्या कोठे आहेत याची माहिती घेतली जाईल संबंधित डॉक्टरांना तातडीने रुग्णालयात धाडले जाईल. या सेवेत डॉक्टरांनी कामचुकारपणा केला तर वरिष्ठांना माहिती देऊन संबंधित डॉक्टरांवर तातडीने कारवाई केली जाईल. आरोग्य खात्याने शोधलेल्या या नामी शकलीमुळे डॉक्टरांवर आता रुग्णांचा वॉच आणि नियंत्रण राहणार आहे. ज्याची डय़ूटी आहे त्यांना रुग्णालयात थांबावेच लागणार आहे.

कामचुकारांवर नियंत्रण राहील – डॉ.प्रदीप व्यास
प्रत्येक रुग्णाला तातडीने उपचार मिळाले पाहिजेत. नियुक्त केलेल्या डॉक्टरांनी रुग्णालयात वेळेत असणे आवश्यक आहे. त्यासाठीच आरोग्य खात्याने ही नामी शक्कल शोधून काढली आहे. कंट्रोल रूमला तक्रारीचा फोन आल्यानंतर संबंधित यंत्रणा त्या डॉक्टरला कॉल करेल. तातडीने रुग्णालयात जाण्याची सूचना दिली जाईल आणि तरीही त्यांनी निष्काळजीपणा दाखवला तर याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जाईल. नियमानुसार वरिष्ठ अधिकारी संबंधितांवर कारवाई करतील. विशेष म्हणजे प्रत्येक आलेला कॉल रेकॉर्ड केला जाणार आहे, असे आरोग्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी ‘सामना’ शी बोलताना सांगितले.

आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध होईल – आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार
१ नोव्हेंबरपासून ही सुविधा महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील मेडिकल ऑफिसर्सचे नाव आणि संपर्क पत्ता कंट्रोल रूमला असणार आहे. आलेल्या तक्रारीचे तातडीने निवारण केले जाणार आहे. संबंधित रुग्णालयामध्ये डॉक्टर उपस्थित नसतील तर रुग्णाला कोणत्या ठिकाणी सेवा उपलब्ध आहे. त्याची माहिती दिली जाईल. प्रत्येक घडामोडीची माहिती संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनाही दिली जाईल. या सुविधांमुळे राज्यामध्ये आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध होणार आहे.

अशी आहे राज्यात आरोग्यसेवा
महाराष्ट्रात १८११ प्राथमिक रुग्णालये आहेत. ३८७ ग्रामीण रुग्णालये आहेत, ५० बेडची ५६ उपजिल्हा रुग्णालये आहेत, १०० बेडची २५ उपजिल्हा रुग्णालये आहेत, ४ सामान्य रुग्णालये आहेत. ११ महिला रुग्णालये आहेत तर २३ जिल्हा रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयांतील डॉक्टरांचा कंट्रोल रूमशी संपर्क असणार आहे.