मतदारांच्या मदतीसाठी 15 हॉटलाइन

सामना प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना येत असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोग आणखी 15 हॉटलाइन सुरू करणार आहे. नवमतदारांची ऑनलाइन नावनोंदणी, नावांची पडताळणी आणि इतर माहितीसाठी 1950 हा नंबर देण्यात आला आहे. त्यावर जास्त ताण पडू नये म्हणून या हॉटलाइन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी दिली. दरम्यान, मुंबई आणि उपनगरासाठी मतदार नोंदणीची शेवटची तारीख 30 मार्च आहे.

निवडणूक संकेतस्थळाची ‘बोलती’ बंद
निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या ‘एनएसव्हीपी. डॉट इन’ या संकेतस्थळाची बोलती बंद झाली आहे. संकेतस्थळावर कुठेही क्लिक केले तर एरर येतो. काही वेळा तर संकेतस्थळ उघडत नाही अशा तक्रारी नवमतदारांनी केल्या आहेत. हा मुद्दा अनेकांनी आमच्या लक्षात आणून दिला असून याची माहिती आम्ही मुख्य निवडणूक आयोगाला दिल्याचे कुमार यांनी सांगितले.