एक होतं पाणी सिनेमातून वस्तुस्थिती दिसणार, पोस्ट प्रॉडक्शनचं काम जोमाने सुरू

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठीत दिवसागणिक नवनवीन आशयघन आणि सामाजिक विषयांवरील सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमांमधून अनेक लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांची फौज मराठी चित्रपटसृष्टीला मिळत आहे. लवकरच अशाच एका ताज्या दमाच्या मंडळींचा नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं नाव ‘एक होतं पाणी’ असं आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम जोरदार सुरू आहे. न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज निर्मित ‘एक होतं पाणी’ या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन सुरू आहे. या चित्रपटात महत्वाची भूमिका बालकलाकार चैत्रा भुजबळ ही करत आहे. नुकतेच तिचे डबिंग पार पडले यात चैत्राने अभिनेते गणेश मयेकर यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. उषा नावाच्या मुलीची भूमिका तिने साकारली आहे. ज्या मुलीला गावाच्या बाहेरून पाणी आणावे लागते, त्यामुळे तिला शाळेत जाता येत नाही. त्यामुळे तिची शाळा बुडते. याअगोदर चैत्राने माझी तपस्या या चित्रपटात काम केले होते व तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. आता या चित्रपटात तिने महत्वपूर्ण भूमिका केली आहे. गावात टँकर येत नाही त्यामुळे सारे गावकरी वैतागले आहेत. अशी आजच्या गावोगावची वस्तुस्थिती सांगणारा हा चित्रपट आहे.

सामाजिक विषयाला हात घालणारा ‘एक होतं पाणी’ हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे. प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता,पाणी वाचवले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे.

विजय तिवारी व डॉ. प्रविण भुजबळ हे सिनेमाचे निर्माते आहेत. आशिष निनगुरकर लिखित या सिनेमाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले आहेत. हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या भूमिका या सिनेमात आहेत.