‘फर्जंद’ मध्ये पहा शिवरायांचा पराक्रम

सामना ऑनलाईन । मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या शूर मावळ्यांच्या पराक्रमावर आधारलेल्या ‘फर्जंद’ या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. बॉलीवूडचे ट्रेड ऍनलिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ‘फर्जंद’ चे पोस्टर अतिशय लक्षवेधी असून पोस्टरमध्ये मराठीतील अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळत आहेत.

‘स्वामी समर्थ मूव्हीज क्रिएशन एलएलपीची प्रस्तुती असणारा ‘फर्जंद’ येत्या १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्धय़ाने आपल्या जिवाची बाजी लावत मूठभर मावळय़ांना सोबत घेत किल्ले पन्हाळय़ावर कशी यशस्वी चढाई केली होती, याचा रोमांचकारी इतिहास ‘फर्जंद’ या चित्रपटाद्वारे आपल्यासमोर उलगडणार आहे.