शिक्षकांच्या बदलीसाठीच्या नव्या पद्धतीचा पहिला बळी

उदय जोशी, केज

बदलीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांपासून नेट कॅफेवर केंद्रावर जागरण आणि बदलीचं दडपण सहन न झाल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. शिक्षकांच्या बदलीसाठीच्या ऑनलाईन पद्धतीचा हा राज्यातील पहिला बळी आहे. मधुकर सावळे (वय ४९ वर्ष) असे या शिक्षकाचे नाव आहे. ते साळेगाव केंद्रातील मांगवडगाव ता. केज येथील जल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जेष्ठ सहशिक्षक म्हणून काम करत होते. २५ ऑक्टोबरला बुधवारी रात्री ९:३० त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, ज्यामुळे त्यांचे निधन झाले.

गेले दोन दिवस सावळे हे प्रचंड तणावाखाली होते, आपली बदली कुठे होईल, सगळं काही व्यवस्थित होईल ना याची त्यांना चिंता होती. या चिंतेने त्रस्त असलेल्या सावळेंना  ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची वेबसाईट व्यवस्थित न चालणे आणि  अर्ज भरण्यासाठीचे शिक्षण विभागाचे पोर्टल बंद पडणे यामुळे आणखीनच दडपण आलं होतं. फॉर्म भरण्यासाठी त्यांचं इंटरनेट कॅफेवर जागरण झालं होतं. हे जागरण आणि दडपण यामुळे बुधवारी दुपारी अस्वस्थपणा वाटत होता आणि चक्कर यायला लागली होती. त्यांना तातडीने कळंब जि. उस्मानाबाद येथील एका खाजगी दवाखान्यात प्रथमोपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना बार्शी इथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. सावळे यांच्यावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरउपस्थित होते. सावळे हे मितभाषी, शांत व मृदू स्वभावाचे शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. केज तालुक्यातील साळेगाव केंद्रातील माळेगाव, बोबडेवाडी आणि मांगवडगाव आणि माजलगाव तालुक्यात शिक्षादानाचं काम हे अत्यंत सचोटीने आणि प्रामाणिकपणे केलं, त्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व दुःख व्यक्त केलं जात आहे.