नव्या रेल्वेमंत्र्यांचे नवे आदेश, फेसबुक, व्हॉटसअॅपवरूनही करू शकणार तक्रार

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

निकृष्ट दर्जाचे खाद्यपुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना रेल्वे प्रवासी कंटाळले आहेत. जेवणामध्ये अळ्या,झुरळ, पाली सापडण्याचे अनेक प्रकार गेल्या काही दिवसात उघडकीस आले आहेत. या कंत्राटदारांना चाप बसावा म्हणून नवे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी नवा आदेश जारी केला आहे. अन्नपदार्थांच्या डब्यावर कंत्राटदाराची माहिती छापा असे आदेश देण्यात आले आहेत. या डब्यावर पदार्थ शाकाहारी आहे का मांसाहारी, पदार्थाचं वजन, पॅकींगची तारीख या सगळ्या गोष्टी असायलाच हव्या असंही आदेशात म्हटलं आहे.

बुधवारी सगळ्या विभागीय महाव्यवस्थापकांना पत्राद्वारे हा आदेश कळवण्यात आला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे. कॅगने रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबद्दल रेल्वे प्रशासनावर सडकून ताशेरे ओढले होते. त्यानंतरही वाईट दर्जाचं अन्न किंवा त्यामध्ये किडे, अळ्या, पाली सापडण्याचं प्रमाण कमी झालेलं नव्हतं. यामुळे रेल्वेमंत्र्यांनी हे नवे आदेश जारी केले आहेत. कंत्राटदारांविरूद्ध जर तक्रारी आल्या तर त्यावर तातडीने कारवाई करण्यासही सांगण्यात आलं आहे. या कंत्राटदार तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांविरोधात फेसबुक किंवा व्हॉटसअॅपच्या माध्यमातूनही तक्रार करता येऊ शकते असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.