लवकरच काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण, अर्थमंत्र्यांचा हिरवा कंदील


सामना प्रतिनिधी । मुंबई

वस्त्रोद्योग धोरणाच्या धर्तीवर काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे आश्वासन देऊन अर्थमंत्री सुधीर मुंनगटीवार यांनी आज काजू उद्योजकांच्या अनेक मागण्यांना हिरवा कंदील दाखवला. काजू प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन योजनेतून 6 टक्के व्याज परतावा देण्यास तत्त्वतः मान्यता देतानाच काजू उद्योगाच्या मूल्यवर्धित कर (व्हॅट) परताव्यापैकी शासनाकडे प्रलंबित असलेली 15 टक्के रक्कम आठ दिवसांत देण्याचे आदेश दिले. तसेच सोलर प्रकल्पासाठी 50 टक्के अनुदान देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सिंधुदुर्ग भाजप माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली काजू पीक समितीच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सह्याद्री विश्रामगृहावर भेट घेतली. यावेळी ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी काजू उद्योजकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. काजू बोंडूपासून इथेनॉल व सीएनजी निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प उभारण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले जेणेकरून भविष्यात या बाय-प्रॉडक्टमधून अर्थार्जनदेखील होऊ शकेल. या बैठकीसाठी प्रदेश कार्यालय सहसचिव शरद चव्हाण, राजन चिके, काजू पीक समिती सदस्य अमित आवटे उपस्थित होते.