नवी प्रणोती कशी असेल?

संजीवनी धुरी-जाधव,[email protected]

डोण्ट वरी बी हॅप्पीमध्ये स्पृहा जोशीच्या जागेवर  स्वानंदी टिकेकर दिसणार आहे… त्यानिमित्ताने तिच्याशी गप्पा…

नाटय़रसिकांच्या मनाला भावलेले ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकातील प्रमुख भूमिकेतून स्पृहा जोशीने एक्झिट घेतली आहे. त्यामुळे प्रणोतीच्या भूमिकेत कोण दिसणार अशी उत्कंठा नाटय़ रसिकांमध्ये होती, पण हा प्रश्न आता सुटलाय. या नाटकासाठी नवीन प्रणोती सापडलीय. झी वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली स्वानंदी टिकेकर प्रणोतीच्या भूमिकेत दिसणार आहे.

स्वानंदीला या नाटकाबाबत विचारले तेव्हा ती म्हणते, या नाटकात प्रणोती प्रधानची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली याचा खूप आनंद होतोय. याआधी मी स्पृहाचे काम पाहिले आहे. त्यामुळे नाटक पाहिल्यानंतर कुठल्याही अभिनेत्रीला जसे वाटते की असे रोल लिहिले गेले पाहिजेत, अशी नाटकं लिहिली गेली पाहिजेत. त्याच्यात आपल्याला काम करता आलं पाहिजे असेच माझ्याही मनात आले होते. प्रयोग पाहिल्यानंतर मला विचारण्यात आलं की तू ही भूमिका करशील का? तेव्हा मला माहीतही नव्हते की स्पृहा नाटक सोडणार आहे ते. खरं तर मला स्पृहाचे काम पाहायला अत्यंत आवडते. स्पृहा त्यात अप्रतिम काम करते त्यामुळे एक प्रेशर होतच, पण मला डेफिनेटली वाटलं की इतकी चांगली स्क्रिप्टस् परफॉर्म करण्याची संधी, अनुभव जर कलाकार म्हणून मला घेता येत असेल तर मी त्याला लगेच हो म्हणेन. एवढय़ाच विचाराने मी हो म्हणाल्याचे ती सांगते.

त्यानंतर ती सांगते की सगळय़ात आधी माझ्यासाठी अनुभव घेणे महत्त्वाचे आहे. माझा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न असणार आहे की चांगली भूमिका करायची.आपल्याला सिद्ध करणे हे बॅक ऑफ द माईण्ड असते. पण त्यात नकारात्मकता काही नाही आहे. सगळं अत्यंत सकारात्मक आहे. ती माझ्यासाठी संधी आहे. कलाकारांसाठी आव्हानात्मक भूमिका मिळणे हेच सगळय़ात महत्त्वाचे असते. जे सगळेच जण करतात,  करू शकतात. मनाला प्रश्न पडतात की काय सगळं तेच तेच करायचे. कधीतरी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जाऊन भूमिका करायला काय हरकत आहे असेही ती सांगते.

या नाटकाबाबत ती सांगतेय की, नाटकासाठी मी प्रचंड मेहनत घेतेय. आमच्याकडे तालिमीसाठी फार दिवस नसल्याने कमीत कमी वेळात ‘माऊण्ट एवरेस्ट’ चढायचा आहे. ते खरंतर फार अवघड आहे, पण अशक्य नाही. आज जेव्हा आम्ही नाटकाच्या तालमी करतो तेव्हा त्यात आणखी बदल करतोय. असं नाही की स्पृहा अशी करायची तू असे करायला हवे. तुला यातून काय सापडतंय ते तू शोध याचं स्वातंत्र्य मला दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी दिले आहे. हे सोपे नाही आहे की दोनशे पंचाहत्तर प्रयोग एका वेगळय़ा अभिनेत्रीबरोबर करायचे आणि अचानक तो रिदम बदलून एका वेगळय़ाच अभिनेत्रीसोबत पुढचे काही प्रयोग करायचे. पण तरीही खूप छानपणे मला या साऱया टीमने सामावून घेतलंय. कदाचित अजून  काहीतरी नवीन सापडेल जे तुम्ही घेऊन जाऊ शकाल असेही स्वानंदी सांगते.

आजच्या समस्यांपैकी एक नाटक

नाटकाच्या विषयाबाबत स्वानंदी सांगते की, मला असे वाटते की विषय म्हणून हे नाटक अत्यंत महत्त्वाचे आहे आणि प्रत्येकाला रिलेट होईल असे हे नाटक आहे. आजच्या जगामध्ये प्रत्येकासमोर आढळणाऱया समस्यांपैकी एका समस्येची डिल करणारे नाटक आहे. पती-पत्नीतले नाते,जगण्यातला ताणतणाव यावर भाष्य करणारे नाटक आहे. तसेच नाटक अत्यंत साधे आणि अत्यंत टू द पॉईण्ट आहे. ते नाटक बघत असताना त्याचा गांभीर्य हळूहळू उलगडत जातं आणि तोच नाटकाचा प्लस पॉईण्ट आहे.

वेगळी प्रणोती सापडेल

प्रणोती या भूमिकेबाबत स्वानंदीला विचारले असता ती सांगते, मला असं वाटत नाही की नवीन किंवा जुनी प्रणोती या नाटकात आहे. ही वेगळी प्रणोती म्हणायला हरकत नाही. प्रत्येक कलाकाराची एक वेगळी शैली असते. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळं असतं. त्यामुळे ती जी कुठेतरी जी भूमिका करतो त्यामध्ये झळकतो. मुद्दामहून म्हणून काही होणार नाही. अत्यंत सहजपणे माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण कुठेतरी मिसळत मिसळत मातीतून एक प्रणोती तयार होईल असे वाटतेय.