राणादा, अंजलीला भेटायचंय? मग वेळमर्यादा पाळा!

सामना ऑनलाईन । मुंबई

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे कोल्हापूरमधील वसगडे हे छोटेसे गाव अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाले. हे गाव आणि तिथला गायकवाडांचा वाडा आता मालिकाप्रेमींसाठी पर्यटनस्थळच बनलाय. तुम्हीही या गावात जाऊन राणादा, अंजलीला भेटायचा विचार करत असाल तर यापुढे तुम्हाला वेळमर्यादा पाळावी लागणार आहे. तसे फर्मानच प्रॉडक्शन टीमने काढले आहे.

टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल असलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे लहानशा वसगडे गावात कलाकारांना भेटण्यासाठी, शूटिंग पाहण्यासाठी आता गर्दी वाढू लागलीय. शूटिंग पाहायला येणाऱ्यांमुळे वसगडेवासीयांना पार्किंगचा प्रश्न सतावतोय. वाढत्या गर्दीचा गावकऱ्यांना त्रासही होतोय. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर या मालिकेचे शूटिंग बंद करण्यात यावे, अशी नोटीस नुकतीच वसगडे ग्रामपंचायतीने निर्मात्यांना धाडली. या मालिकेवर शेकडो लोकांचे रोजगार अवलंबून असल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मध्यस्थीनंतर पुन्हा एकदा या गावात आता ‘लाइट, कॅमेरा अॅण्ड अॅक्शन’चे सूर गुंजू लागले आहेत. अर्थातच निर्मात्यांना यापुढे काही नियम, अटींचे पालन करावे लागणार आहे.

मालिकेच्या लोकप्रियतेमुळे राज्यभरातून चाहते वसगडे गावात येतात. विकेण्डला, सुट्ट्यांमध्ये मोठी गर्दी असते. चाहत्यांच्या प्रेमामुळे आम्ही शूटिंगच्या ब्रेकदरम्यान चाहत्यांची आणि कलाकारांची भेट घालून द्यायचो. यापुढे ठरावीक वेळेतच चाहत्यांना कलाकारांना भेटता येईल. तसे फलकच आम्ही गावात ठिकठिकाणी लावले आहेत. यापुढे चाहत्यांना पार्किंगही गावाबाहेरच करावे लागणार आहे.
-रवी गावडे, प्रॉडक्शन हेड, तुझ्यात जीव रंगला