पश्चिम घाटात सापडली अंगठ्याएवढ्या बेडकाची नवी प्रजाती

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

जगातील जैवविविधतेचे मोठे केंद्र असलेल्या पश्चिम घाटातील पर्वतराजीत बेडकाची एक नवीन प्रजाती सापडली आहे. माणसाच्या अंगठ्याच्या आकाराच्या या बेडकाचे नाव तारांकित बटू बेडूक (स्टारी ड्वार्फ फ्रॉग) असे आहे. त्याचा पोटाचा भाग नारिंगी असून पाठ करडय़ा रंगाची आहे, त्यावर तारांकित आकाशासारखे ठिपके आहेत.

अंगठय़ाच्या आकाराचा या लहान बेडकाला अस्ट्रोबॅट्रॉकस कुरिचियाना असे नाव नाव देण्यात आले आहे. ते त्याचे शास्त्रीय नाव आहे. त्याच्या शरीरावरील ठिपके व तो आढळतो तेथील कुरीचियारमला ही मानवी प्रजात, यांच्यावरून त्याला हे नाव देण्यात आले आहे. एका वैज्ञानिक नियतकालिकात याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. ए. कुरिचियाना ही विज्ञानासाठी बेडकाची केवळ नवी प्रजाती आहे. एवढेच नव्हे तर या शोधामुळे बेडकांच्या प्रजातीला प्राचीन वारसा लाभला आहे. या बेडकाशी संबंधित प्रजाती काही कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असाव्यात असे अमेरिकेतील फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी या संस्थेचे डेव्हिड ब्लॅकबर्न यांनी म्हटले आहे.

पूर्ण तपकिरी रंगाचा हा बेडूक असून त्याचा पोटाकडचा भाग नारिंगी आहे, त्याच्या अंगावर फिकट निळे ठिपकेही आहेत. पाने ओली असतात तेव्हा तो त्यावर दिसून येत नाही. अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाचे संशोधक सीनापुरम पलानीस्वामी विजयकुमार यांच्या मते या बेडकाचा रंग पहिल्यांदा वेगळा जाणवला. त्याच्यावर तारकांसारखे ठिपके आहेत. त्याला निळसर झाक आहे. यासारखे काही पूर्वी कधीच पाहिले नव्हते. तारकांसारखे ठिपके असलेला बेडूक नवीन प्रजातींचा शोध घेताना कधी दिसला नव्हता. पश्चिम घाटात पर्वतराजीमध्ये भटकंती केली असता हा बेडूक सापडला आहे. विजय कुमार व कार्तिक शंकर यांनी त्याचा अभ्यास केला असून त्यात या प्रदेशातील बेडूक, सरडे व साप यांच्या अधिवासांचा नकाशा तयार करण्यात आला होता.

* अस्ट्रोबॅट्रॉकस कुरिचियाना बेडूक
* पश्चिम घाटात अधिवास
* कोटय़वधी वर्षांपूर्वीच्या प्रजातीतील दुवा
* अंगठय़ाएवढा आकार
* पोटाकडे नारिंगी रंग
* पाठीवर गर्द तपकिरी रंग
* शरीरावर तारकांसारखे निळसर ठिपके