वाकोला धोबीघाटात स्वच्छतेचा नवा मंत्र

सामना ऑनलाईन । मुंबई

रबरमॅट, टाईल्स, इंग्लिश कमोड, भिंतींना स्टील रेलिंग अशा आधुनिक सोयीसुविधायुक्त असलेले स्वच्छतागृह वाकोला धोबीघाटातील नागरिकांना मिळाले आहे. शिवसेनेच्या प्रयत्नाने म्हाडाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या स्वच्छतागृहामुळे स्थानिकांची गैरसोय दूर झाली आहे.

वाकोला धोबीघाट परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी असलेले स्वच्छतागृह जुने झाले होते. स्थानिकांनी ही बाब शिवसेना आमदार संजय पोतनीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती. आमदार पोतनीस यांनी यशस्वीरित्या पाठपुरावा करून म्हाडाच्या माध्यमातून नवे स्वच्छतागृह बांधून दिले. नुकतेच त्याचे उद्घाटही पोतनीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्वच्छतागृहात ३२ टॉयलेट सीट्स आहेत. भिंतींना लावलेल्या टाईल्समुळे तसेच जमिनीवरील रबरमॅटमुळे स्वच्छता राखणे सुलभ होते. हिंदुस्थानी पध्दतीच्या टॉयलेट सीट्सप्रमाणेच वयोवृध्दांसाठी सोयीस्कर असे कमोडही लावले गेले आहेत. त्याचप्रमाणे आधारासाठी शौचालयाच्या प्रत्येक खोलीत भिंतींना स्टील रेलिंग लावल्या गेल्या आहेत. नागरिकांनी या स्वच्छतागृहाबद्दल आमदार पोतनीस यांचे आभार व्यक्त केले आहेत.

वाकोला धोबीघाटातील नागरिकांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली होती. कोणत्याही क्षणी ते कोसळेल अशी अवस्था होती. त्यामुळे नवे स्वच्छतागृह तातडीने उभारणे गरजेचे होते. पहिल्या टप्प्यात ३२ सीट्सचे स्वच्छतागृह बांधले गेले असून पुढच्या टप्प्यात आणखी ३० सीट्सचे स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. पाणी आणि सिवरेज लाईनचे कामही लवकरच पूर्ण होईल.
-संजय पोतनीस, आमदार