बाप्पासाठी सजावट करा हटके पद्धतीने

<<स्वरा सावंत>>

क्रिस्टल झुंबर

मखरला आणखी शोभा आणणारे क्रिस्टल झुंबर सजावटीच्या दुकानात उपलब्ध आहेत. अगदी छोटय़ात छोटे म्हणजे तीन लाखापासून सुरू आहेत. मखरच्या आणि गणेशमूर्तीच्या आकारानुसार हे झुंबर घेता येतील. ६०० रुपयांपासून २५००रुपयांपर्यंत हे झुंबर विक्रीला आहेत.

फ्लोरल मखर

सध्या फ्लोरल डिझाइन्सचे रेडीमेड मखर बाजारात उपलब्ध आहेत. आर्टिफिशियल फुलांनी जरी हे मखर बनवले असले तरीही अत्यंत सुबक आणि कमी जागेत बसणारे हे मखर आहेत. यातही तुमच्याकडे गणपतीबाप्पा दीड दिवस विराजमान असतील तर नैसर्गिक फुलांना पसंती द्या… खरी फुलांची सजावट ही दोन दिवस टिकू शकते. यातही पाळणा, देव्हारा, सिंहासन अशा अनेक डिझाइन्स पाहायला मिळतील. यासाठी तुमची ऑर्डर बुक करताना फक्त एवढंच करा… तुमच्या बाप्पाच्या पाटाची किंवा चौरंगाची साईज योग्य (अचूक) द्या! बाजारात याची किंमत १२०० रुपयांपासून ते १० हजारांपर्यंत आहे. नैसर्गिक फुलांमध्ये ऑर्किडला जास्त डिमांड असून या वाडीचा खर्चही अधिक आहे. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर, डेकोरेशन, गणेशाची मूर्ती… आता सध्या सगळीकडेच इकोफ्रेण्डलीचा अवलंब होतोय. पर्यावरणाचा ऱहास थांबवण्यासाठी आता सगळीकडेच जनजागृती होत असतानाच चायना मेड वस्तू कशा वापरल्या जाणार नाहीत याबाबतही बाप्पांच्या भक्तांमध्ये तितकीच जागृती आहे. यासाठीच आपल्यालाही येत्या गणेशोत्सवात काय काय पर्यावरणपूरक गोष्टी वापरता येतील पाहू या…

कापडी मखर

हाताळायला सहजसोपे असणारे हे मखर कमी जागेत, जास्त फापटपसारा न ठेवता शोभून दिसण्यासारखे आहेत. यात विविध रंगसंगती केलेले मखर, आपल्या टेबलच्या साईजनुसार बनवून होता येतील. सध्या यावर्षी बाजारात हा नवा प्रकार दाखल झाला आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे गणपतीनंतरही अक्षरशः घडी घालून हा मखर व्यवस्थित ठेवता येऊ शकतो. साधारणतः याची किंमत दोन हजार रुपयांपासून पुढे आहे.

अगरबत्ती

श्रींच्या पूजेत विशेष महत्त्व असणाऱया अगरबत्तीमध्ये प्रत्येक वर्षी खूप विविधता असते. यंदाही 8 फुटांपर्यंतची अगरबत्ती बाजारात उपलब्ध आहे. सध्या घरगुती बाप्पांसाठी १९ इंची ब्रुट मस्क, मैसूर क्वीन, गोल्ड, ट्विस्ट, महागणपती या अगरबत्तींचा जास्त खप आहे. तर स्वामी, रॉयलवुड, पानडी, सँडलवुड, अनमोल, उदरोज, हीना, ड्रीम, प्रीमियम कॉन्फिडन्स या अगरबत्याही वेगळेपणा टिकवून आहेत. सध्या बाजारात चायना आणि व्हिएतनामवरून येणाऱया अगरबत्त्या आणि धूपची विक्री मोठय़ा प्रमाणात आहे. याबाबत हिंदुस्थानात याची निर्मिती करण्याची गरज असल्याचे महाराजा अगरबत्तीचे मालक अरविंद शहा यांनी सांगितले.

छत्र

दूर्वा, दूर्वाहार, कंठी, मोदक, मुकुट, उंदीरमामा, बाजूबंद, कडे अशा एक ना अनेक दागिने आणि गणपतीबाप्पाचा घाट बाजारात विक्रीला ठेवला आहे. यामध्ये गणपतीबाप्पाचे छत्र खूपच लक्ष वेधून घेत आहे. मेटलिक स्वरूपात असणाऱया या छत्राला पूजेच्या गणपतीबाप्पाच्या मूर्तीमागे छान सजवता येतील. छोटय़ा स्वरूपातील हे छत्र-आर्टिफिशियल ज्वेलरी दुकानांतही उपलब्ध असून 1500 रुपयांपासून याची किंमत आहे.

मेटल मखर

सिल्व्हर टच दिलेले मेटल मखर हवे असेल तर त्याची किमान वर्षभर आधी ऑर्डर द्यावी लागेल. बाप्पासाठी छान सिंहासन कायमस्वरूपी या मखरामध्ये बनवून घेता येईल. कोरीव काम सिल्व्हर पत्र्यांवर करून मेटलिक टच या मखरला दिलेले आहेत. यंदाच्या गणपतीला लागणाऱया या मेटल मखरची ऑर्डर एक-दोन वर्षांपूर्वीच घेतल्याचे ठाण्याचे कारागीर योगेश पाठारे यांनी सांगितले. हे मखर  जरा खर्चिक असले तरी किमान दहा-बारा वर्षे टिकते.  हे स्वच्छ करण्यासाठी सोल्युशन दिले जाते. त्यामुळे चांदीची चकाकी  चकाकत राहते.

फाऊंटन लाइटस्

डेकोरेशनमध्ये वापरण्यात येणाऱया फोकस लाईटस्, स्पॉटलाइटला तोडीस तोड ठरणारे फाऊंटन लाइटस् सध्या मार्केटमध्ये भाव खातायत. पाण्याच्या तरंगामुळे घरभर पसरणाऱया या लाईटस्मुळे मखर किंवा सजावटी अधिक आकर्षक होत आहे. आकाराला एक फुटाच्या आसपास असणे हे फाऊंटन चायना मेड असले तरी यावर्षीचे सर्वात लक्षवेधी लाईटस् ठरत आहे. याची किंमत 400 रुपयांपासून पुढे आहे.