नववर्षाच्या सुरुवातीलाच पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी

सामना प्रतिनिधी । भोर

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते सारोर्ळीपर्यंतचे वाढलेले अतिक्रमण व महामार्गाचे काम करणाऱ्या रिलायन्स इन्फास्ट्रक्चरकडून संथगतीने होत असलेले रुंदीकरण, वाहतूक पोलिसांचा अभाव या रोजच्या समस्यांमुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हजारो वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. महामार्गावर भोर फाटा ते किकवीपर्यंत वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. अनेक सेवारस्तेही कोंडले होते. पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी झाल्याने आता वर्षभर कोंडीचा सामना करावा लागणार का? असा प्रश्न प्रवासी करत होते.

३१ डिसेंबर व नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक वाहनांसह घराबाहेर पडले होते. आज परतीच्या प्रवासात मात्र पर्यटकांसह नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. कापूरव्होळ येथील भोर फाट्याकडून मांढरदेवीकडे जाण्यासाठी तसेच साताऱ्याकडून पुणे बाजूकडे परतीच्या मार्गाला निघालेली वाहने वाकडी-तिकडी जात होती. त्यातच भोर फाटा येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी नसल्याने व महामार्गाच्याकडेला हॉटेल व्यावसायिकांच्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. कापूरव्होळ येथील मुख्य चौकात उड्डाणपुलाची आवश्यकता असूनदेखील उड्डाणपूल न उभारता चुकीच्या ठिकाणी उभारणी केल्याने येथील वाहतूक कोंडी कायम होती. ससेवाडी, चेलाडी फाटा, किकवी, सारोळा येथेही अशीच अवस्था निर्माण झाल्याने मेगाब्लॉक प्रवाशांची पाठ सोडत नसल्याचे समोर आले. रिलायन्स इन्फास्ट्रक्चरचे अधिकारी व एनएचआयच्या वरिष्ठ अधिकारी यांना संपर्क केला असता प्रतिक्रिया देणे टाळले.

सायंकाळी मेगाब्लॉक होण्याची शक्यता

आज पौष पौर्णिमा असल्याने नारायणपूर व मांढरदेवीला जाण्यासाठी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. तसेच मांढरदेवी यात्रेवरून भाविक मंगळवारी सायंकाळी परतीच्या मार्गाला भोर फाटा येथून सातारा-पुणे दोन्ही बाजूंना निघणार आहे. तसेच भोर फाट्यापासून जवळपास दीडशे मीटर अंतरापर्यंत असणाऱ्या कापूरव्होळ चौकातून नारायणपूर येथून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असणार आहे. यामुळे अशा वेळी वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्यास आजच्या प्रमाणेच महामार्गावर उद्याही मेगाब्लॉक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

”मांढरदेवी यात्रा आणि नारायणपूर येथून येणाऱ्या वाहनांच्या पाश्र्वभूमीवर कापूरव्होळ चौक येथील गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. अवजड वाहने व वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालवू नये याची दक्षता घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलीस सज्ज राहणार आहेत. असे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी सांगितले”.