वर्षअखेरीसाठी पर्यटकांची कोकणाला पसंती

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळाची निवड करत आहेत. उद्यापासून सलग तीन दिवस सुट्टीचा हंगाम सुरु होत असल्याने कोकणातील पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येणार आहेत यंदा कोकणात पर्यटकांना स्कूबा डायव्हींग, बॅक वॉटर सफारी, व्हॅलिक्रॉसिंगसारखे साहसी खेळ अनुभवता येणार आहेत तसेच गणपतीपुळ्यातील सरस प्रर्दन कोकणी पदार्थांची मेजवानी देणारे ठरणार आहे.

डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येतात उद्यापासून सुट्टीचा हंगाम सुरु होणार आहे. शनिवार, रविवार, सोमवार अशी सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येत आहेत़ यंदा स्थानिकं लोकांनी पर्यटकांसाठी काही विेशेष गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यामध्ये मिर्या समुद्रकिनारी स्थानिक तरुणांनी सुरु केलेले स्कूबा डायव्हींग हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहेत. मिर्या समुद्रकिनारी समुद्राचे अंतरंग पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. स्कूबा डायव्हींगसाठी मोठ्या संख्येने पर्यटक तारकर्लीला जातात. आता रत्नागिरीमध्ये स्कूबा डायव्हींगची सोय झाल्याने पर्यटकांना समुद्र सफरीचा आनंद मिळणार आहे.

रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सने भाट्ये समुद्रकिनारी व्हॅलिक्रॉसिंग या चित्तथरारक खेळाचे आयोजन केले आहे. तीन दिवस हा व्हॅलिक्रॉसिंगचा उपक्रम चालणार असल्याने पर्यटकांना त्याचाही आनंद लुटता येणार आहे. चिपळूण गोवळकोट येथे बॅकवॉटर सफारी आणि क्रोकोडाईल सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून गणपतीपुळे येथे २३ ते २७ डिसेंबर दरम्यान सरस प्रर्दन आयोजित करण्यात आले आहे. या प्रर्दनात कोकणी पदार्थ आणि कोकणातील बांबूपासून बनवलेल्या आकर्षक वस्तू पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहेत.