‘मी टू’मधून हॉलीवूडमधील लैंगिक शोषणाचा पर्दाफाश

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

ऑस्कर विजेते निर्माते हार्वे वाइनश्टीन या निर्मात्याकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधात हॉलीवूडच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियावर ‘मी टू’ चळवळ सुरू केली. या चळवळीच्या मुळाशी जात हॉलीवूडमधील लैंगिक शोषणाचा पर्दाफाश करणाऱ्या वार्तांकनाला यंदाचा प्रतिष्ठेचा ‘पुलित्झर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘द न्यूयॉर्कर’ यांच्या टीमने हा पुरस्कार पटकावला आहे. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठाने १०२ व्या पुलित्झर पुरस्कारांची घोषणा केली. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या जुडी कांटोर आणि मेगन ट्वोहे तसेच ‘न्यूयॉर्कर’ या मासिकाचे रोनन फॅरो या पत्रकांरानी हे स्कॅण्डल उघडकीस आणले. त्यासाठी तिघांना पुलित्झर देत असल्याची घोषणा समितीचे प्रमुख दाना कॅनेडी यांनी केली.

मुंबईच्या दानिश सिद्धिकींनाही पुलित्झर

मुंबईतील ‘रॉयटर्स’चे छायाचित्रकार दानिश सिद्धिकी यांनाही पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळालेले ते हिंदुस्थानातील पहिले छायाचित्रकार ठरले आहेत. म्यानमार आणि बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासितांची दानिश यांनी काढलेली छायाचित्रे या पुरस्कारासाठी पात्र ठरली. त्यांच्या छायाचित्रांतून रोहिंग्या मुस्लिमांचे जळजळीत वास्तव जगासमोर आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दानिश यांनी आनंद व्यक्त केला.

अमेरिकेतील २०१६ सालच्या निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप यासंदर्भातील वृत्त प्रकाशित करणाऱया ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ यांना राष्ट्रीय वार्तांकनाचा पुरस्कार मिळाल्याची घोषणा दाना कॅनेडी यांनी केली.

फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रोड्रीगो डुटेर्ट यांनी अमली पदार्थांविरोधात दिलेल्या लढय़ाची वस्तुस्थिती मांडणाऱ्या ‘रॉयटर्स’ च्या लेखाला आंतरराष्ट्रीय वार्तांकनाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘रॉयटर’ ने प्रसिद्ध  केलेल्या रोहिंग्या मुसलमानांवरील फोटो फिचरलाही विशेष पुरस्कार मिळाला आहे.

ललित साहित्याचा पुरस्कार ऍण्ड्रय़ू सेअन ग्रीर यांना तर नाटकाचा पुरस्कार ‘कॉस्ट ऑफ लिव्हींग’च्या लेखिका मरत्याना मजोक यांना मिळाला आहे. ऐतिहासिक लेखनासाठीचा पुरस्कार ‘द गल्फ-द मेकिंग ऑफ ऍन अमेरिकन सी’ ने पटकावला आहे.