बॉलरच्या डोक्याला लागला आणि सिक्स गेला !

सामना ऑनलाईन । ऑकलंड

न्यूझीलंडमधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत फिलिप ह्यूज प्रकरणाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. या स्पर्धेतील एका सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर जीत रावलने तडाखेबाज शतक ठोकले. त्याने १५३ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १४९ धावा काढल्या. यावेळी फटकेबाजी करताना त्याने मारलेला एक ‘स्ट्रेट ड्राईव्ह’ प्रतिस्पर्धी टीमचा बॉलर अॅण्ड्यू एलिसला डोक्याला चाटून गेला.

जीत रावलने मारलेल्या या फटक्याचा वेग इतका जबरदस्त होता की डोळ्याचे पाते लवण्याच्या आत चेंडू एलिसच्या डोक्याला धडकून मैदानाच्या बाहेर गेला. या फटक्यानंतर रावलने तातडीने एलिसच्या दिशेने धाव घेत त्याची विचारपूस केली. एलिसनेही उपचारासाठी तातडीने मैदान सोडले. सुदैवाने एलिसला गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे तो मैदानावर पुन्हा खेळण्यासाठी परतला.

ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्युजेसला २०१४ मधील शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील सामन्यात हूक करण्याच्या प्रयत्नात चेंडू लागला होता. त्यावेळी मैदानातच कोसळलेल्या ह्युजेसचा नंतर दुखापतीने मृत्यू झाला. न्यूझीलंडमध्ये बुधवारी घडलेल्या प्रकाराने या चटका लावणाऱ्या प्रसंगाची पुन्हा एकदा आठवण झाली. केवळ आयुष्याची दोरी बळकट असल्यानेच अॅण्ड्यू एलिसला यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही.