नियमाचे उल्लंघन नाही, विराट कोहलीला आयसीसीकडून क्लीनचीट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहली डग-आऊटमध्ये बसून वॉकी-टॉकीवर बोलतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र विराटकडून नियमाचे उल्लंघन झालेले नाही, असे सांगत आयसीसीने त्याला क्लीनचीट दिली आहे.

वॉकीटॉकी वापरण्यासाठी विराटने आमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती, असे आयसीसीने सांगितले. डग-आऊट बसलेला संघ आणि ड्रेसिंग रुममधले सहकारी यांच्यात संवाद साधण्यासाठी वॉकीटॉकीचा वापर करण्यात येतो. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे स्थानिक अधिकारी बीरसिंह यांची परवानगी घेतली होती. बीरसिंह यांनी विराट कोहलीची वॉकीटॉकी तपासून घेतल्यानंतर विराटला वॉकीटॉकी वापरण्याची परवानगी दिली होती; अशी माहिती आयसीसीकडून देण्यात आली.