New Zealand दोन मशिदींत बेछूट गोळीबार,बांग्लादेशचा संघ थोडक्यात बचावला

सामना ऑनलाईन, ख्राइस्टचर्च

न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरात भयंकर नरसंहार घडला. एका माथेफिरूने दोन मशिदींमध्ये घुसून बेछूट गोळीबार केला. त्यात 49 जण ठार आणि 20 जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारच्या नमाजासाठी यावेळी मशिदीत आलेले बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू थोडक्यात बचावले. दरम्यान, माथेफिरू हल्लेखोरासह चारजणांना अटक करण्यात आली आहे. निर्वासितांविरुद्धच्या संतापातून आपण हत्याकांड केल्याची कबुली हल्लेखोराने दिली आहे. धक्कादायक म्हणजे हल्लेखोराने गोळीबाराचे फेसबुक लाइव्ह केल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त होत आहे.

ख्राइस्टचर्च शहरातील ‘अल-नूर’ मशिदीत शुक्रवारी दुपारच्या नमाजासाठी गर्दी झाली होती. दुपारी 1.45 च्या सुमारास हल्लेखोर हातात बंदूक घेऊन मशिदीत घुसला आणि बेछूट गोळीबार सुरू केला. काळे कपडे परिधान केलेल्या हल्लेखोराच्या डोक्यावर हेल्मेट होती. येथे किमान 30 जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. अवघ्या दोन मिनिटांत हल्लेखोर मशिदीबाहेर पडला आणि आपल्या कारकडे जाताना रस्त्यावरील नागरिकांवरही गोळीबार केला. त्यानंतर कारमधून तो लिनवूड येथील मशिदीत गेला. तेथे घुसून गोळीबार केला. त्यात किमान 10 जण ठार झाले.

बांगलादेशच्या खेळाडूंना सुरक्षित बाहेर काढले

क्रिकेट मालिकेसाठी बांगलादेशचा संघ न्यूझीलंडमध्ये आहे. उद्यापासून (दि. 16) ख्राइस्टचर्च येथे न्यूझीलंड आणि बांगलादेशमध्ये कसोटी सामना खेळला जाणार आहे. नमाजासाठी बांगलादेशचे खेळाडू अल-नूर मशिदीत गेले होते. बेछूट गोळीबार सुरू होताच खेळाडू प्रचंड हादरले. जीव मुठीत धरून त्यांना मशिदीच्या मागच्या दरवाजातून बाहेर सुरक्षित काढण्यात आले. दरम्यान, हा फारच भीतीदायक अनुभव होता. थोडक्यात बचावलो. सर्व खेळाडू सुरक्षित आहेत असे नमीम इकबालने म्हटले आहे. बांगलादेश संघ उद्या मायदेशी परतणार असून क्रिकेट मालिका रद्द केली आहे.

हा दहशतवादी हल्ला -पंतप्रधान

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॉसिंडा आर्डर्न यांनी हा हल्ला अत्यंत भयंकर आहे. हा दहशतवादी हल्ला असून अनेक निर्वासित यात मृत्युमुखी पडल्याचे म्हटले आहे. निर्वासितांना विरोध करण्यासाठी हा हल्ला केला असावा. परंतु निर्वासितही न्यूझीलंडचे नागरिक आहेत. कट्टरवाद्यांना येथे स्थान नाही असे पंतप्रधान आर्डर्न यांनी म्हटले आहे.

28 वर्षांचा ऑस्ट्रेलियन… फेसबुक लाइव्ह आणि 74 पानी मॅनिफिस्टो

हल्लेखोराची ओळख पटली असून त्याचे नाव ब्रेंटन टॅरंट असल्याचे सांगण्यात येते. तो ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे.  ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

28 वर्षीय ब्रेंटन टॅरंटसह चारजणांना अटक केली असून त्यात एक महिला आहे. हा हल्ला फक्त टॅरंटने केला की इतर तिघेही सहभागी होते याचा तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्त माईक बुश यांनी सांगितले.

या हल्ल्याचे ब्रेंटन टॅरंट याने 17 मिनिटे फेसबुक लाइव्ह केले. काल गुरुवारीच त्याने आपल्या फेसबुक पेजवर हल्ल्याची धमकी दिली होती. ‘चला, आता पार्टीला सुरुवात करूया’ असे तो या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. त्यानंतर अल-नूर मशिदीच्या दिशेने तो रवाना झाला. त्याच्या कारमध्ये अनेक शस्त्रं दिसत असून गोळीबाराचेही लाइव्ह सुरू होते.

हल्लेखोर टॅरंटजवळ 74 पानी मॅनिफिस्टो सापडला. त्यात निर्वासितांविरुद्ध हल्ला करण्याचा कट दोन वर्षांपासून सुरू होता. तसेच गोळीबाराचे ठिकाण तीन महिन्यांपूर्वी निवडण्यात आल्याचे म्हटले आहे. निर्वासित हे हल्लेखोर आहेत. या हल्लेखोरांना हजारो लोकांनी मारले. त्याचा बदला घ्यायचा आहे असे यात म्हटले आहे.