न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू करतो हेल्मेट घालून गोलंदाजी


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच फलंदाज आणि यष्टिरक्षक हेल्मेट घालून खेळताना आपण पाहात असतो. कारण सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालून खेळणं महत्वाचं असतं. मात्र जर एखादा गोलंदाज हेल्मेट घालून गोलंदाजी करत असेल तर हे पाहून नक्कीच आश्चर्य वाटेल.

न्यूझीलंडमधील वॉरेन बार्न्स नावाचा स्थानिक क्रिकेटपटू हेल्मेट घालून गोलंदाजी करतो. न्यूझीलंडच्या स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत हेल्मेट घालून गोलंदाजी केल्यामुळे वॉरेन सध्या चर्चेत आहे. न्यूझीलंडमध्ये खेळली जाणाऱ्या सुपर स्मॅश टी-२० लीगमध्ये ओटागो क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या वॉरेन बार्न्सने हेल्मेट घालून गोलंदाजी केली. २५ वर्षीय वॉरेनच्या गोलंदाजीची अॅक्शन जरा वेगळीच आहे. चेंडू टाकल्यानंतर त्याचा फॉलो थ्रू खालच्या दिशेने राहतो.

हेल्मेट घालून गोलंदाजी करणाऱ्या वॉरेनने यामागचं कारणही सांगितलं आहे. वॉरेनच्या गोलंदाजीची अॅक्शन वेगळीच असल्याने असं करत असल्याचं म्हटलं आहे. चेंडू टाकल्यानंतर जर एखाद्या फलंदाजाने त्याच्या दिशेने सरळ शॉट मारला तर बचाव करता येणे शक्य नाही. त्यामुळेच वॉरेनने सुरक्षेसाठी हेल्मेट घालून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.