देव तारी त्याला कोण मारी…रेल्वे ट्रॅकवर फेकलेले अर्भक वाचले

सामना प्रतिनिधी । टिटवाळा

अवघ्या वीस दिवसांच्या नवजात बालकाला निर्दयी मातेने रेल्वे ट्रॅकवर फेकल्याची खळबळजनक घटना टिटवाळ्यानजीकच्या बल्याणी येथे घडली आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून बालिका सुखरूप असून पालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

बल्याणी रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या गवताच्या झुडपात मंगळवारी सकाळी बाळाचा रडण्याचा आवाज आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी येथे धाव घेतली. नवजात अर्भक पाहून नागरिकांनी तत्काळ पोलिसांना खबर दिली. टिटवाळा पोलीस, रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाळाला कल्याण-डोंबिवली पालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे बाळाच्या तब्येतीचा धोका टळला आहे. उपचारानंतर बाळाला शिशुगृहात दाखल केले आहे. दरम्यान नवजात बाळाला फेकणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.