कनिष्ठ जातीची असल्याने सासरच्यांकडून छळ, तरुणीची आत्महत्या

सामना ऑनलाईन । मुंबई

कनिष्ठ जातीची असल्यामुळे आणि हुंड्यासाठी छळ केल्याने एका २२ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. मुलुंडमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. मृत तरुणीचे नाव आरती असून गेली ८ वर्षे प्रशांत कापडे या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते.

आरतीच्या सासरच्यांनी ती कनिष्ठ जातीची असल्याचे तिचा छळ केला होता, असा आरोप आरतीच्या आई वडिलांनी केला आहे. आरती आणि प्रशांतचे याच महिन्यात लग्न झाले होते. प्रशांत मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी स्वरुपात कामाला होता. ही बाब आरतीच्या वडिलांना पसंत नव्हती. पण मुलीच्या प्रेमापोटी त्यांनी या लग्नाला परवानगी दिली. लग्नाच्या दोनच दिवसानंतर सासरच्यांनी आरतीला कनिष्ठ जातीची असल्याने छळायला सुरुवात केली. आरतीला घरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांनी सांगितले, तिने नकार दिल्यावर सासरच्यांनी तिला बेदम मारहाण केली अशी माहिती आरतीचे वडिल जगदीश मोहिते यांनी दिली.

१९ ऑगस्ट रोजी घरी कोणी नसताना आरतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती कनिष्ठ जातीची असल्याने तिचा छळ होत होता, या कारणाने तिने यापूर्वी तीनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती आरतीच्या नातेवाईकांनी दिली. या प्रकरणी आरतीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सासरच्यांनी आरतीचा छळ केला होता असे प्राथमिक तपासात आढळल्याने पोलिसांनी त्यांच्यावर हुंड्यासाठी छळ, हिंसाचार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.