एकाच कथेवर दोन दिग्दर्शक करणार चित्रपट

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या बॉलिवुडमधील दोन दिग्दर्शकांमध्ये एकाच कथेवर चित्रपट बनवण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. भूमी चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्यात जामनेरचे महाराज जाम साहेब दिग्विजयसिंगजी रणजीतसिंगजी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी शीतयुद्ध सुरू झाले आहे.

दिग्दर्शक ओमंग कुमार आपल्या आगामी भूमी चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर या चित्रपटासाठी तयारी सुरू करणार आहेत. महाराजा दिग्विजयसिंगजी यांच्या भूमिकेसाठी अभिनेता संजय दत्तची निवड करण्याचा विचार ते करत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण हिंदूस्थानसह संपूर्ण आशिया खंडात तसेच पोलंडमध्ये करण्याचा विचार ओमंग कुमार करत आहेत. सध्या कथेवर काम सुरू असून चित्रीकरणाला थोडा उशीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर याच कथेवर चित्रपट करणार असून त्याबाबत त्यांनी अजून काहीच माहिती दिलेली नाही. सूत्रांनी सांगितल्यानुसार, त्यांनी आधीच त्या कथेचे हक्क विकत घेतले असून ते त्या कथेवर काम करत आहेत.