‘वायू’वेगाने येणार आज मुंबईत पाऊस हवामान खात्याचा अंदाज

940

सामना ऑनलाईन, मुंबई

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ बुधवारी सकाळपर्यंत मुंबईच्या सागरी क्षेत्रात दाखल होण्याची शक्यता असल्याने मुंबईत उद्या ‘वायू’वेगाने पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ‘वायू’ चक्रीवादळाचा वेग ताशी 135 किलोमीटर असून हे तीव्र स्वरूपाचे चक्रीवादळ आहे. 13 जूनपर्यंत ते गुजरातच्या पोरबंदर आणि वेरावळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होशाळीकर यांनी दिली. सध्या हे चक्रीवादळ मुंबईच्या नैऋत्येला वेगाने सरकत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अरबी समुद्रातील पूर्व-मध्य आणि दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे चक्रीवादळ उठले आहे. आज रात्री साडेआठ वाजेपर्यंत संपलेल्या सहा तासांमध्ये ते 15 किलोमीटर पुढे सरकले, अशी माहिती हवामान खात्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

एनडीआरएफची 36 पथके गुजरातेत तैनात

13 जूनला गुजरातच्या किनारपट्टीवर ‘वायू’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज तातडीची बैठक बोलवली. प्रत्येकी 45 जवानांचा समावेश असलेली राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन दलाची (एनडीआरएफ) 26 पथके गुजरातच्या किनारपट्टी भागात तैनात करण्यात आली आहेत. गुजरात सरकारच्या विनंतीवरून आणखी दहा पथके पाठवली गेली आहेत.

आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याबाबतच्या सूचना गृहमंत्री शहा यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. चक्रीवादळामुळे काही नुकसान झाल्यास प्रभावित भागांमध्ये वीज, दळणवळण, आरोग्य, पिण्याचे पाणी आदी सुविधा तातडीने पोहोचतील याची काळजी घेण्यासही त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालय गुजरातसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, दमण-दीव सरकारशी सतत संपर्क ठेवून आहे.

लष्कराच्या हेलिकॉप्टर्सद्वारे परिस्थितीचा आढावा

तटरक्षक दल, नौदल आणि लष्कराची युनिटस्ही संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. लष्कराच्या हेलिकॉप्टर्सद्वारे वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत.

समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता

गुजरातच्या पोरबंदर आणि महुआदरम्यानची किनारपट्टी तसेच वेरावळ आणि दीवच्या किनारपट्टीच्या भागांना चक्रीवादळामुळे धोका संभवू शकतो. किनारपट्टीच्या कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागढ, दीव, गीर सोमनाथ, आमरेली आणि भावनगर या जिह्यांमध्ये समुद्रात उंच लाटा उसळतील अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 ‘वायू’ चक्रीवादळामुळे मुंबई, गुजरातच्या मान्सूनला अडथळा निर्माण होईल आणि मान्सूनचे ढग पाकिस्तानच्या दिशेने सरकतील असाही एक अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

‘चक्रीवादळामुळे सागरी हवामान बिघडल्याने मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किनारपट्टीला राहणाऱ्या नागरिकांनाही सावधानतेच्या सूचना संबंधित खात्याकडून दिल्या गेल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या