सीमोल्लंघन

नितिन फणसे

अमित मसूरकर…या मराठमोळय़ा दिग्दर्शकाचा हिंदी चित्रपट ‘न्यूटन’ ऑस्करवारीसाठी निघालाय…

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यावर्षी हिंदुस्थानतर्फे ‘न्यूटन’ हा हिंदी सिनेमा पाठवण्यात येतोय. हा मान अमित मसूरकर या एका मराठमोळ्या दिग्दर्शकाला मिळालाय ही मोठी बाब आहे. दसरा म्हणजेच विजयादशमीच्या मुहूर्तावरच मसूरकरांनी सीमोल्लंघन करत सर्केत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागात आपला सिनेमा धाडला आहे. या एकाच सिनेमात रोमान्स, ड्रामा, थ्रिलिंग, ऍक्शन अशा सर्व बाबी असतानाही तो आजघडीचा सिनेमा वाटतो. त्याला हल्लीच्या राजकारणाचीही जोड बेमालूमपणे देण्यात मसूरकर यशस्वी झाले आहेत.

आपल्या या घवघवीत यशाबद्दल अमित मसूरकर यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, माझ्यासाठी आयुष्यातील ही सर्वात मोठी घटना आहे. माझा सिनेमा यशस्वी ठरेल असं जरी वाटलं होतं तरी त्याला इतकं यश मिळेल याची कल्पनाही केली नव्हती. माझ्या आईला माझ्या यशाची पूर्ण कल्पना होती. दुर्दैवाने या सिनेमाचं चित्रीकरण सुरू असतानाच ती निघून गेली. त्यामुळे या सिनेमाच्या यशामागे तिचे आशीर्वादच असावेत हे मनोमन पटतं, असेही त्यांनी स्पष्ट केले. ६७ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाचे ट्रेलर सर्वप्रथम दाखवण्यात आले. तेथे या सिनेमाने परदेशी चित्रपटांच्या गटात सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून पुरस्कारही मिळवला. त्यावेळी तेथे उपस्थित सर्वांनीच या सिनेमाची तारीफ केली. यात काही बडय़ा लोकांबरोबरच सर्वसामान्य प्रेक्षकांचाही समावेश होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘न्यूटन’ हा सिनेमा आजच्या व्यवस्थेवर बेतलेला आहे. कोणताही सिनेमा करायचा म्हणजे लेखक आणि दिग्दर्शकाला त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागतो. या सिनेमातील पार्श्वभूमी, कथानक पाहून तर यावर सखोल अभ्यास केला गेला असणार हे स्पष्ट जाणवतं. कारण आपल्या देशात मतदान आणि मतमोजणी याबाबत सर्वात जास्त थ्रिल असते. एखादा उमेदवार किती मतांनी जिंकला आणि किती मतांनी त्याने प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत केलं… कारण निवडणूक म्हटलं की मतदान, विजय, पराजय हे सगळं ठरतं ते मतांच्या आकडय़ांवरून.. न्यूटन हा नवखा सरकारी कर्मचारी बिहारसारख्या नक्षलबहुल राज्यात निवडणुकीच्या डय़ुटीवर जातो तेव्हा त्याला काय काय अनुभव येतो त्यावर अमित मसूरकर यांनी या सिनेमा उभारला आहे.

‘न्यूटन’मध्ये केंद्रीय भूमिका राजकुमार राव याने साकारली आहे. त्याच्याबद्दल बोलताना मसूरकर म्हणाले की, राजकुमार राव एक अफलातून अभिनेता आहे. त्याच्याबरोबर काम करतानाच माझ्या ते लक्षात आले. थेट प्रेक्षकांच्या मनात भिडणारा अभिनय त्याने या सिनेमात केला आहे. त्याने अनेक चित्रपट केले असतील, पण त्याचे मोजून पाच सिनेमे पाहून मी थक्कच झालो. यात ५ सिनेमांत ‘ट्रॅप्ड’ हा विक्रमादित्य मोटवानी यांचा सिनेमा होता. हंसल मेहता दिग्दर्शित ‘सिटीलाईट’ होता. हंसल यांच्याच ‘अलीगढ’ आणि ‘शाहीद’ या सिनेमांवरही त्याने खूप मेहनत घेतली होती. ‘शाहीद’साठी तर राजकुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

खूपच वेगळा चित्रपट

मुळात हा सिनेमा निवडणुकीतील मतदानावर आधारलेला असल्याने तो २००१ साली आलेल्या ‘सिक्रेट बॅलॉट’ या एका इराणीयन सिनेमावर बेतलेला असल्याचं बोललं जातंय. पण मसुरकरांना ते मान्य नाही. ते म्हणतात, ‘२०१३ साली मी या सिनेमाची कथा लिहिली. त्यानंतर जवळपास आठ महिन्यांनी मी पटकथा लेखक मयांक तिवारी यांना ती दाखवली. मग त्यावर आम्ही काम सुरु केलं होतं. तोपर्यंत ‘सिक्रेट बॅलॉट’ हा सिनेमा मी पाहिलाही नव्हता. शूटिंग सुरू होणार त्याच्या दोनच दिवस आधी मला त्या सिनेमातील क्लिपिंग्स पाहण्याची संधी मिळाली. ती पाहून तर माझा विश्वासच झाला की माझा सिनेमा त्यापेक्षा खूपच वेगळा आहे. त्या इराणी सिनेमाशी या सिनेमाचं काहीच साम्य नसल्याचं माझ्या लक्षात आलं. माझ्या सिनेमाने आतापर्यंत ४० देशांचा प्रवास केला आहे. प्रत्येक वेळी त्या त्या देशातील प्रेक्षकांनी या सिनेमाची तारीफच केली आहे. कुठल्या सिनेमाची हा सिनेमा म्हणजे कॉपी असता तर त्यावेळीच मला त्यांनी ते बोलून दाखवलं असतं, असेही ते म्हणाले.