न्यूझीलंडच्या ब्रुमचं बूम….बूम…बूम…

सामना ऑनलाईन, न्यूझीलंड

निल ब्रुमच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड क्रिकेट संघाने गुरुवारी येथे झालेल्या दुसऱ्या वन डेत पाहुण्या बांगलादेश संघावर ६७ धावांनी दिमाखदार विजय मिळवला आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. यावेळी नाबाद १०९धावांची खेळी साकारणारा निल ब्रुम सामनावीर ठरला.

न्यूझीलंडकडून मिळालेल्या २५२ धावांचा पाठलाग करणाऱया बांगलादेशचा डाव १८४ धावांमध्येच गडगडला. इमरुल कायेसने सर्वाधिक ५९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून केन विल्यमसनने २२ धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तसेच ट्रेण्ट बॉल्ट व टीम साऊथी यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. लॉकी फर्ग्युसन व मिचेल सॅण्टनर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दरम्यान, याआधी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार मश्रफी मोर्तझा ऍण्ड कंपनीने प्रभावी गोलंदाजी केली. पण निल ब्रुमने १०७ चेंडूंचा सामना करताना तीन षटकार व आठ चौकारांनिशी नाबाद १०९ धावांची खेळी साकारताना बांगलादेशच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मश्रफी मोर्तझाने ४९ धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तास्किन अहमद व शाकीब उल हसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.