पडघ्याचे पुन्हा एकदा दहशतवादी कनेक्शन, बोरिवली गावातून अकीब नाचणला एनआयएने घेतले ताब्यात

पुण्यात दोन दहशतवाद्यांना पकडल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून अजून काही नावे समोर आल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. याच पुणे कनेक्शनमधून एनआयएने भिवंडी-पडघ्याच्या बोरिवली गावातील अकीब नाचणला शनिवारी पहाटे घरातून ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अकीबची एनआयएने कसून चौकशी सुरू केली आहे.

पुण्यात एनआयएने पकडलेल्या जुल्फीकारअली बडोदावाल्याने अनेक जणांना दिवेघाटात बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याची कबुली दिली. या तपासातून आणखी काही जणांची नावे पुढे आली आहेत. त्याच कनेक्शनमध्ये एनआयएची टीम आज पहाटेच पडघ्याच्या बोरिवली गावात धडकली आणि त्यांनी अकीब नाचण याला ताब्यात घेतले. याआधीही जयपूर येथील अशाच एका देशविघातक कृत्यात सहभाग असल्याच्या संशयावरून मध्य प्रदेश एनआयएने अकीबला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. अत्यंत गंभीर बाब म्हणजे जुल्फीकार बडोदावाला आणि शर्जिल शेख या दोघांनाही कट्टरपंथीय संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून पडघा गावातूनच ताब्यात घेण्यात आले होते. हे दोघेही पडघ्याचे रहिवासी नाहीत. मात्र त्यांनी अलीकडेच तेथे मुक्काम ठोकला होता. याच गावातील साकीब नाचण हाही अतिरेकी कारवायांसाठी कित्येक वर्षे कारावास भोगत होता. त्यामुळे पडघ्याचे दहशतवादी कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.