दिव्यातील घटनेचीही एनआयए चौकशी करणार

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिवा स्टेशनजवळ रूळांवर अज्ञात व्यक्तीने रूळ आडवा टाकला होता. हा प्रकार एका रेल्वेच्या चालकामुळे उघडकीस आला होता. ही प्रकार घातपात घडवून आणण्यासाठी केला होता का याची एनआयए द्वारे चौकशी केली जाणार आहे. दहशतवादविरोधी पथक म्हणजेच एटीएस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए याची चौकशी करतील.

उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये २० नोव्हेंबर रोजी झालेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये १५० लोकांचा बळी गेला होता. ही दुर्घटना रेल्वेचे रूळ विस्फोटकांनी उडवून दिल्याने घडली होती. या दुर्घटनेमागे आयएसआयचा हात असल्याची तपास यंत्रणांना शक्यता वाटत आहे. कारण या प्रकरणी ३ जणांना बिहारच्या मोतीहारीमधून अटक करण्यात आली आहे. या तिघांनी नेपाळमधल्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून आपण हे कृत्य केल्याचं कबूल केलं आहे. ही व्यक्ती आयएसआयशी संबंधित असल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे.

कानपूरमधल्या या दुर्घटनेनंतर २२ जानेवारीला आंध्र प्रदेशातील विजयानगरम जिल्ह्यात जगदलपूर-भुवनेश्‍वर हिराखंड एक्‍स्प्रेसचे कुनेरूजमळ ९ डबे रूळावरून घसरले होते. ज्यामुळे ३९ जणांचा मृत्यू झाला होता. याही ठिकाणी रेल्वेचे रूळ विस्फोटकांनी उडवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या तीन घटनांकडे बघितल्यास रेल्वे रूळ उडवून देणं किंवा त्यावर रूळ आणून टाकणं ही सामाईक गोष्ट असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळेच एनआयए आणि एटीएसने दिव्यातील प्रकारामागे दहशतवादी संघटनांचा हात आहे का हे तपासायला सुरू केलं आहे.