हिंदुस्थानी संघ उभारणार विजयाची गुढी?

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळी करत बांगलादेशने निधास टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. बांगलादेशचा सामना जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या हिंदुस्थानी संघाशी आज (रविवारी) होणार आहे. संपूर्ण मालिकेत बांगलादेशने कामगिरी पाहता हिंदुस्थानी संघही बांगलादेशला कमी लेखण्याची चूक करणार नाही.

हिंदुस्थानची मालिकेतील सुरुवात निराशजनक होती. पहिल्याच सामन्यात हिंदुस्थानला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता, मात्र त्यानंतर जोरदार कम बॅक करत सलग तीन सामने जिंकत हिंदुस्थानी संघानं फायनलमध्ये धडक मारली. तर दुसरीकडे बांगलादेशनेही श्रीलंकेला दोनदा पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातल्या अखेरच्या सामन्यात मोठा वाद झाला होता. या वादानंतरही एका क्षणी गमावलेला सामना बांगलादेशनं जिंकला, त्यामुळे बांगलादेशचा आत्मविश्वास वाढला आहे.

या खेळाडूंवर असेल मदार

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्याकडून हिंदुस्थानी क्रिकेट चाहत्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. रोहित आणि शिखर यांच्याकडे संघाला धमाकेदार सुरुवात करुन देण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मनीष पांडे यांच्याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

सुंदर जलवा दाखवणार

गोलंदाजामध्ये वॉशिग्टन सुंदरने आपला जलवा दाखवला आहे. जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज यांना आपली कमाल दाखवता आली नसली तरी त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

बांगलादेशला कमी लेखू नका

बांगलादेशचा विचार केला तर त्यांच्याकडे तमिम इक्बाल, लिट्टन दास, मुशफिकर रहीम, महमुदुल्ला, शाकिब अल हसन यांसारखी मोठी अनुभवी फौज आहे. त्यामुळे हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यातील अंतिम सामना अटीतटीचा होण्याची दाट शक्यता आहे.

हिंदुस्थान
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, जयदेव उनादकट, युजवेंद्र चहल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत, वाशिंग्टन सुंदर, लोकेश राहुल, अक्षर पटेल, दीपक हुड्डा आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश
शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकर रहीम, तमीम इक्बाल, महमुदुल्लाह, रुबेल हुसेन, शब्बीर रहमान, सौम्या सरकार, नाजमुल इस्लाम, लिट्टन दास, तस्कीन अहमद, मुस्तफिजूर रहमान, मेहंदी हसन, इमरुल कायेस, अरीफूल हक, नुरूल हसन, अबू हैदर रोनी आणि अबू झायद.