दिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या

सामना ऑनलाईन, गोदावरी

घरामध्ये असताना महिला सुती गाऊन घालणं पसंत करतात. घरात काम करायचं असेल तर या महिला दिवसभर गाऊनमध्येच असतात. गाऊनची सवय लागलेल्या महिलांना चिंतेत टाकणारा आदेश गावच्या समितीने दिला आहे. या समितीने आदेश दिलाय की दिवस मावळायच्या आधी जर कोणत्या महिलेने गाऊन घातला तर तिच्याकडून 2 हजार रुपये दंड वसूल केला जाईल.

आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील तोकालापल्ली गावातील 9 जणांच्या समितीने एक निर्णय घेतला. जर एखादी महिला सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेमध्ये गाऊन घातलेली दिसली तर तिच्याकडून दंड वसूल करायचा. विशेष बाब ही आहे की ज्या गावाने हा निर्णय घेतला आहे त्या गावच्या सरपंच या महिला आहेत.

गावच्या सरपंच फंतासिया महालक्ष्मी यांनी या निर्णयाबाबत बोलताना सांगितलं की ‘काही महिलांनी गाऊन घालून भाजी विकत घ्यायला जाणे, बैठकांमध्ये सहभाग घेणे यावर आक्षेप घेतला होता. या महिलांनी गावातील ज्येष्ठांना गाऊनवर दिवसातील ठराविक वेळेसाठी बंदी घालावी अशी विनंती केली होती. या विनंतीमुळेच ही बंदी घालण्यात आली असून दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे’