निकिताचे गुलाब

शिवाजी सुतार

निकिता गॅलरीत आली. नेहमीप्रमाणे टपोरे गुलाब गॅलरीतल्या कुंड्यांत फुलले होते. त्यांचा सुगंध गॅलरीत ओसंडून वाहत होता. निकिता गुलाबाच्या एका रोपट्याजवळ गेली आणि आपले गोबरे गाल फुलांवर टेकवत म्हणाली, ‘गुड मॉर्निंग राजांनो’. तसं ती फुलंही वाऱ्याच्या झुळकीसह डोलली आणि त्यांनीही तिला गुड मॉर्निंग केलं. गॅलरीतल्या त्या गुलाबाच्या फुलांचे निकिताला खूपच लळा होता. ती फुलं तिचा जीव की प्राण होती. कधी एखादं कोमजलेले फूल तिला दिसलं की, तिच्या काळजात धस्स होऊन जाई. ती त्या फुलाबद्दल मग आईकडे काळजी वक्त करून आईला म्हणे, ‘आई, ते फूल बघ गं कसं मलूल झालंय!’ मग तिची आई तिला समजावे. म्हणे, ‘अगं, तू कशाला एवढी काळजी करतेस! त्याला काहीही होणार नाही. अगं, कधी कधी सभोवतालच्या दूषित वातावरणाचा परिणाम होतो आणि फुले अशी कोमजलेली दिसतात बघ.’ आईनं असं शंकेचं निरसन केलं की, ती निश्चिंत होऊन जात असे.

नेहमीप्रमाणं त्या दिवशी निकिता आपल्या आवडत्या गुलाबांचा गोड निरोप घेऊन शाळेत गेली होती. दुपारची वेळ होती. मधली सुट्टी थोडय़ा वेळानं होणार होती. अचानक निकिताला काय झालं कुणास ठाऊक, ती वर्गात एकाएकी भोवळ येऊन पडली. ते पाहताच मॅडम गडबडल्या. त्यांनी ग्लासमधून पाणी घेऊन निकिताच्या तोंडावर शिंपडलं. काही वेळानं निकिता शुद्धीवर आली. मॅडम तिला म्हणाल्या, ‘काय गं, काय झालं? तुला बरं वाटत नव्हतं तर शाळेत यायचं नव्हतं ना?’ निकिताच्या तेंडातून मात्र शब्द फुटला नाही. नंतर मॅडमनी शिपायाला तिला तिच्या घरी सोडून येण्यास सांगितलं.’

दुपारच्या वेळी तेही शाळेतील शिपायाबरोबर आलेल्या निकिताला पाहून निकिताची आई खूपच घाबरली. ती धावत जाऊन निकिताला बिलगली. ‘काय झालं तुला?’ तिने निकिताला विचारलं. शिपाई म्हणाला, ‘मॅडम, वर्गात अचानक निकिताला भोवळ आली.’
‘अहो, सकाळी तर ती अगदी नॉर्मल होती. मग दुपारीच असं…?’
‘ते काहीही असू द्या मॅडम, प्रथम निकिताला डॉक्टरकडे घेऊन जा’, शिपाई थोडय़ा काळजीनेच म्हणाला. पंधराएक मिनिटांनी निकिताच्या आईनं आपल्या फॅमिली डॉक्टरांचा दवाखाना गाठला. डॉक्टरांना थोडं नवल वाटलं. ‘मॅडम, काय झालं? सर्व ठीक तर आहे ना?’ डॉक्टरांनी त्यांना विचारलं.
‘अहो, निकिताला अचानक भोवळ आली म्हणून तिला घेऊन आलेय.’
‘भोवळ! तिला ताप वगैरे नाही ना?’
‘तसं काही जाणवत नाही.’ निकिताच्या आईनं असं म्हणताच डॉक्टरांनी तिला तपासलं. तिचं शरीर साधारण गरम झालेलं त्यांना जाणवलं. ते म्हणाले, ‘थोडा ताप आहे तिला. कदाचित त्यामुळेच भोवळ आली असावी. तरीही काळजी करण्याचे कारण नाही. मी इंजेक्शन, गोळ्या देतो. उद्यापर्यंत होईल ती बरी.’ डॉक्टरांनी इंजेक्शन, गोळ्या दिल्या.

निकिताची आई तिला घेऊन घरी आली. घरी येताच थोडं जेवू घालून तिनं तिला डॉक्टरांनी दिलेली औषधं दिली आणि कॉटवर झोपवलं. निकिताची कॉट खिडकीजवळच होती. ती एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळली तोच तिचे ते आवडते गुलाब तिच्या नजरेस पडले. त्यांना पाहताच ती गालात हसली. तसं ती फुलंही हसली आणि तिला म्हणाली, ‘काय झालं आमच्या परीला असं अचानक?’
‘काही नाही रे. शाळेत एकाएकी भोवळ आली मला.’ ‘अगं पण अशी अचानक भोवळ येण्याचं कारण तरी काय म्हणायचं?’ त्यांनी तिला प्रतिप्रश्न केला.
‘अरे, तेच मलाही समजेनासे झालेय. सकाळी तर मी अगदी ठीक होते हे तुम्ही पाहिलेच आहे, पण दुपारी मला अचानक भोवळ आली’, निकिता त्यांना म्हणाली.
‘तू लवकर बरी हो गं. आम्हाला मुळीच करमत नाही तुझ्याशिवाय’, फुले तिला काकुळतीने म्हणाली. ‘मला तरी कुठे करमतेय… पण काय करू! डॉक्टर अंकलनी बेडवरच पडून राहायला सांगितलंय ना मला. मात्र तुम्ही जरी गॅलरीत असला तरी तुम्ही अगदीच माझ्या जवळच आहात हं… कसं ते सांगा पाहू? नाही ना सांगता येत? अरे, तुमचा सुगंध बघा कसा माझ्या आजूबाजूला घुटमळतो आहे ते! मग सांगा, तुम्ही माझ्याजवळच आहात की नाही?’
‘अरे, हो की! कसं लक्षात आलं नाही आमच्या हे?’ फुलं डोकं खाजवत म्हणाली. फुलं असं म्हणताच निकिता गोड गालात हसली.

संध्याकाळ झाली. निकिताला पुन्हा भोवळ आली. तिच्या आईनं तत्काळ दवाखाना गाठला. डॉक्टरांनी निकिताला लागलीच स्ट्रेचरवरून अतिदक्षता विभागात नेले आणि तिच्यावर उपचार सुरू केले. आज आठवडा झाला. निकिता अजून शुद्धीवर आली नव्हती. डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्या होत्या. सर्वकाही नॉर्मल होते. त्यामुळं डॉक्टरही तिच्या आजारपणाबद्दल थोडे कोड्यात पडले होते. निकिताच्या आईचीही काळजी वाढली होती. डॉक्टर मात्र तिचे समाधान व्हावे म्हणून ‘घाबरू नका, होईल सर्व सुरळीत’ असं सांगून तिला धीर देत होते.
दुपारची वेळ होती. निकिताच्या बाजूलाच असलेल्या सिस्टरला निकिताची किंचितशी हालचाल जाणवली. ते पाहताच ती धावतच डॉक्टरांकडे गेली. ‘सर, निकिता शुद्धीवर आलीय.’ ती डॉक्टरांना म्हणाली.
‘खरंच!’
‘हो सर.’
डॉक्टर लागलीच अतिदक्षता विभागात गेले. निकिता खरोखरच शुद्धीवर आली होती. ‘मला सोडून जाऊ नका. तुम्ही गेलात तर मी कुणाशी हितगुज करणार, कुणाला गुड मॉर्निंग म्हणणार… हं… सांगा बघू!’ असं काहीतरी ती बरळत होती. डॉक्टरांनी देवाचे आभार मानले. कारण ती शुद्धीवर येणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. त्यानंतर चार-एक दिवसांनी निकिता खडखडीत बरी होऊन घरी आली. घरी येताच ती गॅलरीत गेली. तिथे तिच्या सर्व आवडत्या फुलांनी माना टाकल्या होत्या. निकिताचे प्राण वाचावेत म्हणून त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. निकिता त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली, ‘म्हणजे तुम्ही आपलं म्हणणं खरं केलेच तर…’ तिचे डोळे अश्रूंनी भरले. ती कॉटकडे धावली, पुन्हा कधीच गॅलरीत न फिरकण्यासाठी…