‘राजकीय धुरळ्या’त हरवलेली दिल्ली!

>>नीलेश कुलकर्णी<<

[email protected]

दिल्लीला गेल्या आठवड्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आलेल्या धुळीच्या वादळाचा तडाखा बसला. अर्थात हा तडाखा परवडला, पण सध्या केंद्रातील मोदी सरकार आणि दिल्लीतील केजरीवाल सरकार यांच्यातील पराकोटीच्या कुरघोडीमुळे जो राजकीय धुरळा उडाला आहे त्यामुळे सामान्य दिल्लीकरांचा श्वास कोंडला आहे. वायू प्रदूषणापेक्षाही आप विरुद्ध भाजप विरुद्ध इतर या राजकीय प्रदूषणाच्या विळख्यातून दिल्लीकरांची कधी सुटका होईल हा खरा प्रश्न आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांनी थेट राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी धरणे धरून आपण आजही तेवढेच नौटंकीबाज आहोत हे दाखवून दिले. दुसरीकडे नायब राज्यपालांच्या माध्यमातून नाठाळ केजरीवालांना वेसन घालायची आणि त्यांच्या सर्वच महत्त्वाकांक्षांचे यमुनेत विसर्जन करायचे भाजपचे मनसुबे आहेत. या लठ्ठालठ्ठीमधूनच केजरीवालांच्या थेट नायब राज्यपालांच्या निवासस्थानी धडक मारण्याच्या आंदोलनाचा जन्म झाला. आप आणि भाजप यांच्यात सुरू असलेली ही राजकीय   नौटंकी उद्या दोघांच्याही मुळावर येऊ शकते. पंधरा वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी या निमित्ताने जे सांगितले ते महत्त्वाचे. ‘केंद्रात विरोधी पक्षाचे सरकार असले आणि कितीही विपरीत परिस्थिती असली तरी तेथील नेतृत्वाशी जुळवून घेत काम करायचे असते’ अशा शब्दात शीला दीक्षित यांनी आप आणि भाजप या दोघांचेही कान टोचले आहेत.

दिल्लीला स्वतःचे असे काही नाही. पाणी पंजाब, हरयाणातून तर हवा हिमालयातून येते. अशा परावलंबी दिल्लीत दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानातून आलेल्या धुळीने हलकल्लोळ उडवला. अर्थात ही प्रदूषित हवा परवडली, पण तुमचे राजकीय प्रदूषण थांबवा असे भाजप आणि सत्ताधारी आम आदमी पक्ष या दोघांना सुनावण्याची वेळ सध्या दिल्लीकरांवर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असले तरी त्यांची अवस्था ‘बिनदाताच्या वाघा’सारखी आहे. कायदा सुव्यवस्थेसह महत्त्वाचे विषय केंद्राच्या अधीन असल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्रीपद हे केवळ शोभेचे बाहुले असते. त्यात केजरीवालांनी या बाहुल्याची अधिकच ‘शोभा’ केली आहे. त्यात केजरीवाल हे राजकीय स्पर्धक होऊ शकतात या भीतीने सध्या भाजपला ग्रासले आहे. त्यामुळे ‘दिसला केजरीवाल की धोपट त्याला’ अशी रणनीती त्या पक्षाने आखली आहे. दिल्लीच्या दुरवस्थेला केजरीवाल जबाबदार आहेत असे एकवेळ गृहित धरले तरी दिल्लीतील सर्वच्या सर्व सात खासदार भाजपचे आहेत आणि महापालिकांवरही भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भाजपही या दुरवस्थेला तेवढाच जबाबदार आहे. वास्तविक केजरीवाल सरकारने शिक्षण क्षेत्रात चांगले काम केले आहे. मात्र भाजपचा चष्मा द्वेषमूलक आहे आणि तिकडे केजरीवालांच्या नौटंकीला अंत नाही. यामुळे दिल्लीतील  राजकीय धुराळा तूर्त तरी शमण्याची चिन्हे नाहीत. ‘‘दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा द्या. मी तुमचा घराघरांत जाऊन प्रचार करेन’’ अशी नवी पुडी केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे सोडून दिली आहे. दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या घराला सध्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. केजरीवालांचे सोफ्यावर एसीची हवा खात लोळत पडलेले आंदोलन तसेही व्हायरल झाले आहे. या आंदोलनातून पुन्हा आपला सत्तेचा सोपान गाठता येईल असा जबरदस्त आत्मविश्वास केजरीवालांना आहे. पाकिस्तानी धुळीने दिल्लीत निर्माण केलेला प्रदूषणाचा धुरळा यथावकाश खाली बसेल. मात्र, भाजप आणि आपच्या राजकीय प्रदूषणाचा धुराळा कधी खाली बसणार? दिल्लीची या विळख्यातून सुटका होईल काय?.

दिग्विजय सिंग यांची दिव्यदृष्टी

digvijay-singh

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग हे सध्या पुन्हा चर्चेत आले आहेत. अर्थात त्यासाठी त्यांनी काही भव्यदिव्य कामगिरी केलेली नाही किंवा त्यांच्या सल्ल्याने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची भरभराट झाली असेही काही नाही. मात्र एक चुकीचे ट्विट केल्यामुळे दिग्गीराजा देशभरात व्हायरल झाले आहेत. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी सपत्नीक नर्मदा परिक्रमा पूर्ण करून ‘पुण्यार्जन’ करून थकलेभागले असताना शिवराजसिंग चौहानांचे सरकार किती बोगस आहे, हे सांगण्यासाठी दिग्विजय सिंग यांनी एका तुटलेल्या पुलाचा फोटो ट्विट करून ‘देखिए, भोपाल के सुभाष नगर के पास का ये मेट्रो पूल. सही में विकास हो रहा हैं’ असा टोमणा मारला खरा मात्र त्यांनी ट्विट केलेला फोटो प्रत्यक्षात पाकिस्तानातील रावळपिंडीचा होता हे स्पष्ट झाल्यानंतर हे ट्विट राष्ट्रीय विनोदाचा विषय बनले. हीच संधी साधत सध्या ऍण्टीइन्कम्बन्सीचा मुकाबला करणाऱ्या मुख्यमंत्री शिवराजसिंग यांनी ‘दिग्विजय यांना बहुधा आपल्या राजवटीची आठवण झाली असावी’ असा टोला लगावला. अनेक भाजप समर्थकांनी ‘तर दिग्विजय सिंगांचे मन नेहमी पाकिस्तानाच रमते’ अशा शेलक्या शब्दांत त्यांचा समाचार घेतला. चुकीचे ट्विट केल्याचे लक्षात आल्यानंतर दिग्विजय सिंगांनी माफीही मागितली. मात्र भाजपला हे ट्विट म्हणजे ‘आयतेच घबाड’ मिळाले आहे. मध्य प्रदेशच्या निवडणुकीत हे ट्विट पुनः पुन्हा ‘रिट्विट’ होत राहणार हे नक्की.