दिल्ली डायरी : पंतप्रधान मोदींचे भाषण आणि संसदीय प्रतिष्ठा

63

>> नीलेश कुलकर्णी 

सोळाव्या लोकसभेतील शेवटचे भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यात अभिनयासह विरोधकांवर हल्लाबोल केला. अपेक्षेप्रमाणे सभागृहात भाजप खासदारांनी आणि संसदेबाहेर मोदी भक्तांनी त्याचा जयघोष केला. मात्र मोदींच्या या भाषणाने संसदेच्या प्रतिष्ठेची बूज राखली नाही, संसदीय परंपरेचे पालन केले नाही अशी टीका आता होऊ लागली आहे. मोदी यांनी या भाषणातपिछले सत्तर सालों मेंही जुनीच टेप तर वाजवलीच, पणआपको डरना होगा, मैं आपको डराऊंगाअशा शब्दांत विरोधकांना फटकारले. गांधीजींचेकाँग्रेस विसर्जनाचे स्वप्न आपण पूर्ण करू असेही ते म्हणाले. एकंदरीतच पंतप्रधानांचे भाषण संसदीय प्रतिष्ठेला अनुसरून नव्हते तर निवडणुकीच्या प्रचारकी थाटाचे होते 

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी पाच वर्षांतील आपल्या सरकारने केलेली कामगिरी सांगणे अपेक्षित होते. मात्र सांगण्यासारखे गाठीशी काही नसल्याने पंतप्रधान मोदींनी ‘पिछले सत्तर सालों मे’ ही जुनीच टेप नव्याने वाजवली आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ लोकसभेत फोडला. ‘आप को डरना होगा, मैं आपको डराऊंगा’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना ललकारले. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील पराभवाने ‘विरोधकांनी 2024 ची तयारी करावी’  ही भाजपची भाषा हवेत विरली आहे. त्यात राफेलचा ससेमिरा पाठीमागे लागला असल्याने सत्ताधारी धास्तावले आहेत. त्यामुळे बदला घेण्याची भावना निव्वळ कृतीतूनच नाही तर बोलण्यातूनही जाणवताना दिसते. काँग्रेस विसर्जित करण्याचे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले होते. गांधीजींच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त आपण हे स्वप्न पूर्ण करू, असा दुर्दम्य आशावाद पंतप्रधानांनी बोलून दाखविला. विडा उचलून कोणताही राजकीय पक्ष संपत नसतो. राजकीय पक्षाला विजनवासात पाठवायची ताकद केवळ जनतेकडेच असते याचा विसर सत्ताधार्‍यांना पडला असावा.

प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदींनी देशाच्या संसदेच्या पायरीवरच डोके ठेवले होते. त्यावेळी ते खूप भावविवश झाले होते. काँग्रेसने देशाच्या लोकशाहीची काढलेली लक्तरे बाजूला सारून मोदी देशाच्या लोकशाहीला संसदीय प्रतिष्ठेची भरजरी वस्त्रे चढवतील अशी सामान्यजनांची अपेक्षा होती, मात्र गेल्या पाच वर्षांत लोकशाही व संसदीय मूल्यांची जितकी अप्रतिष्ठा करता येईल तितकी केली गेली. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तिथे विधानसभेचे अधिवेशन केवळ औपचारिकता म्हणून, तेही मोदींच्या मर्जीने बोलावले जायचे असा आरोप विरोधक करायचे. त्यावेळी त्यांच्या बोलण्यातून मोदीद्वेष दिसत असे, पण हे ‘गुजरात मॉडेल’ मोदींनी दिल्लीतही प्रस्थापित केल्याचे गेल्या पाच वर्षांत पाहायला मिळाले. संसदीय अधिवेशनावेळी पंतप्रधानाने दिवसभर सभागृहात बसणे अपेक्षित नाही. पंतप्रधानांचा प्रत्येक सेकंद हा देशासाठी महत्त्वाचा असतो, मात्र मोदी गेल्या पाच वर्षांत केवळ पंचवीसेक वेळा संसदेत उपस्थित राहिले. हाही एक विक्रम मोदींच्या नावावर नोंदला जाईल. तसेच संसदेत केल्या गेलेल्या भाषणाची रेकॉर्डमध्ये नोंद केली जाते. त्यामुळे संसदेत बोलताना काही मर्यादा पाळून बोलावे लागते, मात्र त्या सगळ्या प्रघातांना तिलांजली देण्यात आली. राफेलच्या मुद्द्यावरून ‘उलटा चोर चौकीदार को काटे’ असे मोठ्या जोशात पंतप्रधान म्हणाले तरी राफेलच्या मुद्द्यावरून होत असलेले नवे खुलासे सरकारच्या सफेत कांतीवर काळे डाग उमटवत आहेत.

बहेनजींचा दीदींना फोन

कोलकाता पोलीस आयुक्तावर सीबीआयने केलेल्या कारवाईमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना मोदी सरकारने अनायसेच विरोधकांच्या राष्ट्रीय नेत्या बनण्याची संधी दिली. सीबीआय कारवाईविरोधात ममतादीदी ज्या पद्धतीने आंदोलनाच्या मैदानात उतरल्या त्यामुळे दिल्लीतलेही ‘या बाईंचे काय करायचे’ या विचाराने गांगरून गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ममतादीदींच्या राजकारणाला ‘बूस्ट’ मिळाला असतानाच एक आश्चर्यकारक राजकीय घटना घडली ती म्हणजे बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींचा ममतादीदींना फोन जाणे. मायावतींचा आपला एक खाक्या आहे तो म्हणजे त्या आपणहून कधी कोणाला फोन करत नाहीत आणि कोणा राजकीय नेत्याचा फोन आला तर तो घेतही नाहीत. मायावतींचे खासमखास सतीशचंद्र मिश्रा हेच त्यांच्या वतीने फोनाफोनी वगैरे करत असतात. अगदीच अपवादात्मक वेळ असेल तरच मायावती कोणा राजकीय नेत्याला फोन करतात. वर्षानुवर्षे मायवती हा आब वगैरे राखून आहेत. मात्र मोदींचे दिल्लीतले राजकीय गलबत गडबडू लागल्याचे लक्षात आल्यानंतर सध्या सगळी समविचारी मंडळी एकत्र यायला लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बहेनजींनी ‘ममतादीदी, मैं बहेजनी बोल रही हूँ. चिंता मत करो, डरो मत, हम आप के साथ है’ असा दिलासा दिला. मायावतींचा फोन आल्यामुळे रागाने तणतणत असलेल्या ममतादीदीही सुखावल्या. 2019 मध्ये दिल्लीत खिचडी सरकार आले तर ममता व मायावती या दोन महिलांमध्येच पंतप्रधानपदासाठी स्पर्धा होईल असे बोलले जात आहे. पुढचे पुढे, पण बहेनजींनी दीदींना फोन केला हेही नसे थोडके!

देवेगौडा को गुस्सा क्यों आता है?

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी कर्नाटकात फार काळ मुख्यमंत्री राहतील अशी परिस्थिती नसल्याचे लक्षात आल्यामुळे सध्या देवेगौडा अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या वेळी बंगळुरात हातात हात घालून अस्तित्वात आलेले महागठबंधन आता तंगड्यात तंगड्या घालून आपलाच कपाळमोक्ष करण्याची चिन्हे आहेत. कर्नाटकातील सत्तेला घरघर लागेल याचा तणाव असेल कदाचित, मात्र देवेगौडांचा लोकसभेत पारा अचानक चढला आणि त्यांना कसे समजवावे या बुचकळ्यात लोकसभेच्या सभापती पडल्या. तसे देवेगौडा हे संयमी वृत्तीचे. आपला आब आणि प्रतिष्ठा राखून असलेले राजकारणी. माजी पंतप्रधान म्हणून त्यांना एक विशेष प्रोटोकॉल असतो, मात्र त्याचाही ते कधी बाऊ करत नाहीत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर देवेगौडा बोलले, मात्र पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सगळ्याच विरोधकांना झोडपण्याचा एककलमी कार्यक्रम केला. त्यातून देवेगौडाही सुटले नाहीत. कर्नाटकात जेडीयु भाजपसोबत आली नाही याचा राग पंतप्रधानांच्या भाषणातून दिसून आला. देवगौडांची संभावना शेतकर्‍यांचे तथाकथित नेते अशी मोदींनी केल्यामुळे एरवी शांत असलेले देवेगौडा चांगलेच भडकले. मला बोलू द्या अशी हाकाटी त्यांनी लावली, सभापतींना त्यावर निर्णय घेता येईना. देवेगौडांना शांत करण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री व इतर कोणी मंत्रीही धावला नाही. त्यांच्या वयाचा व पदाचा विचार करून त्यांची समजूत घालायला कोणी तयार नव्हते. शेवटी भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी त्यांना कसेबसे शांत केले. देवेगौडांचा राग भाजपला महागात पडेल काय हे कळेलच.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या