निर्भया, उन्नाव आणि असिफा…!

>> नीलेश कुलकर्णी
[email protected]

‘निर्भया’सारख्या दुर्दैवी प्रकरणाची पुनरावृत्ती कधीच होऊ नये. मात्र उत्तर प्रदेशातील उन्नावमधील बलात्काराची घटना आणि जम्मू-कश्मीरच्या खोऱ्यात झालेला असिफा नावाच्या चिमुरडीवरील अत्याचार यामुळे संपूर्ण देश हेलावून गेला आहे. दुर्दैवाने लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी असताना दोन बलात्काराच्या प्रकरणांनी नरेंद्र मोदी सरकारची अब्रू धुळीस मिळाली आहे. सत्तेवर आल्यानंतर विद्यमान केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’सारख्या महत्त्वाकांक्षी घोषणा दिल्या. मात्र या देशात ‘बेटी उठाओ आणि बेटी भगाओ’ असे होऊ नये इतकेच!

यूपीए-२चे सरकार केंद्रात असताना दिल्लीत ‘निर्भयाकांड’ घडले त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या प्रकरणानंतर मौन बाळगले. काँग्रेसी नेत्यांनी व सरकारातल्या मंत्र्यांनी बेमुवर्तखोर भूमिका घेतली. परिणामी मनमोहन सिंग सरकारविरोधात जनतेच्या संतापाचा ज्वालामुखी भडकला आणि त्यात यूपीए सरकार बेचिराख झाले. हा इतिहास फार जुना नाही. दुर्दैवाने लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी असताना दोन बलात्काराच्या प्रकरणांनी नरेंद्र मोदी सरकारची अब्रू धुळीस मिळाली आहे. देशात ऐतिहासिक सत्तांतर झाल्यानंतर जनतेच्या काही माफक अपेक्षा होत्या. सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदीसारख्या निर्णयाचे भाजपने मोठे मार्केटिंग केल्यामुळे जणू आता सोन्याच्या काठीला घुंगरू लावून ती काठी आपटत सामान्य माणूस फिरेल अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली होती, मात्र काँग्रेसपेक्षाही सत्तेचा मस्तवाल वापर भाजपने केल्याची अनेक उदाहरणे आहेत. हरयाणातील जाट आरक्षणाचे आंदोलन सरकारनेच पेटवले आणि त्यानंतर तर बाबा राम रहिमने हरयाणाची राखरांगोळी करेपर्यंत तेथील मुख्यमंत्री मनोहलाल खट्टर हातावर घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसले. वर्णिका कुंडू नावाच्या अधिकाऱ्याच्या मुलीला धमकावल्यानंतर भाजपचा खरा चेहरा उघड झाला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यानंतर जणू प्रति श्रीरामच कारभार करत आहेत अशी आवई उठविण्यात आली, मात्र आपल्या मतदारसंघात शंभर बालके मृत्युमुखी पडल्यानंतर तिकडे भेट देण्याचे सौजन्यही योगींनी दाखविले नाही. हिंदुत्वाच्या बुरख्याआडून केवळ ठाकूरांचे राजकारण योगी आदित्यनाथ यांनी सुरू केले. ठाकूर सोडून प्रत्येक जातीला दाबण्याचे प्रयत्न तेथे सुरू आहेत. त्यातूनच कुलदीप सेंगरसारखे प्रकरण घडले. यूपीए सरकारविरोधातील असंतोषाच्या शिडात हवा भरून त्यावेळचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मोठी मेहनत घेऊन भाजपचे प्रचंड बहुमताचे सरकार सत्तेवर आणले, मात्र हरयाणा, उत्तर प्रदेश आणि जम्मू-कश्मीरमधील स्त्री अत्याचाराच्या दुर्दैवी घटनांमुळे मोदींचाही ‘मनमोहन सिंग’ होण्याची वेळ आली आहे. ‘निर्भया’च्या प्रकरणाचे अश्रू सुकलेले नाहीत. त्यात असिफा आणि उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनांमुळे त्या अश्रूंना पुन्हा बांध फुटला आहे. पंतप्रधानांनी वेळीच डॅमेज कंट्रोल केले नाही तर या अश्रूंच्या पुरात प्रवाहप्रतित होण्याची वेळ त्यांचे सरकार आणि पक्षावर येईल!

सुब्रमण्यम स्वामींची ‘गुगली’

भाजपचे तेजतर्रार खासदार सुब्रमण्यम स्वामी हे भन्नाट व्यक्तिमत्त्व आहे. आणीबाणीच्या वेळी वेषांतर करून संसदेत प्रवेश करण्याची कामगिरी त्यांच्या नावावर आहेच. शिवाय कधीकाळी राजीव गांधी यांचे खास यारदोस्त असलेले स्वामी सध्या पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. गांधी घराण्यावर आरोपांची राळ उडवून स्वामींनी आजवर खळबळजनक राजकारण केले आहे. पी. चिदंबरम देशाचे गृहमंत्री असताना स्वामींनी त्यांना सळो की पळो करून सोडले होते. गृहमंत्री म्हणून चिदंबरम यांनी स्वामींना कुठे ‘अडकवता’ येते का? याचा हरतऱहेने प्रयत्न करून पाहिला, मात्र हे स्वामी ठरेल वस्ताद. सध्या स्वामीजी चर्चेत आले ते त्यांच्या लालू भेटीमुळे. स्वामींचे मित्र एम्समध्ये भरती होते. त्यांना भेटण्यासाठी स्वामी गेले. योगायोगाने लालूही चारा घोटाळ्य़ात शिक्षा झाल्यानंतर आजारपणामुळे एम्समध्ये होते. त्यामुळे माणुसकी धर्म पाळत स्वामींनी ‘लालूजी, कैसे है आप?’ असे म्हणत लालूंची ख्यालीखुशाली विचारली. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या मात्र भुवया उंचावल्या आहेत. विशेषतः लालूंसोबतची दोस्ती तोडून भाजपसोबत सरकार स्थापण्यास भाजपने नवधर्मनिरपेक्ष असलेल्या नितीशकुमारांना भाग पाडले. त्यानंतर लालू आणि कुटुंबीयांमागे सरकारच्या अवकृपेने ईडी आणि सीबीआयचा भुंगा मागे लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारे स्वामींनी लालूंची ख्यालीखुशाली विचारण्याला साहजिकच ‘राजकीय अर्थ’ प्राप्त झाला आहे. जयप्रकाश नारायणांच्या चळवळीत लालू व आपण एकत्र काम केले होते याचा दाखला देऊन स्वामींनी या भेटीचे समर्थन केले आहे. राजकारणात पक्षविरहित माणुसकी जपावी लागते. आता ही ‘माणुसकी’ भाजपवाल्यांच्या कितपत पचनी पडते ते दिसेलच.

एकाकी देवेगौडा…

देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आयुष्याच्या सायंकाळी कर्नाटकाच्या राजकारणात एकाकी पडल्याचे दुर्दैवी चित्र आहे. त्यात देवेगौडांना बोचणारी दुसरी बाब म्हणजे कधीकाळी त्यांच्याच हाताखाली तयार झालेला सिद्धरामय्यांसारखा साधा कार्यकर्ता पुढे काँग्रेसमध्ये जाऊन मुख्यमंत्री झाला आणि आता पुन्हा नव्याने मुख्यमंत्री बनण्यासाठी आगेकूच करत आहे. या सगळ्य़ा धामधुमीत सिद्धरामय्यांचा पाडाव करण्यासाठी देवेगौडांनी तिसऱ्या आघाडीचा ‘गळ’ टाकला होता. बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींसोबत निवडणूकपूर्व आघाडी करून देवेगौडांनी सुरुवातील बाजी मारल्यासारखे चित्र निर्माण झाले होते, मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी कर्नाटकात निवडणूक न लढविता काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने ‘किंगमेकर’ बनण्याचे देवेगौडांचे स्वप्न तूर्तास तरी धुळीस मिळण्याची चिन्हे आहेत. याच कर्नाटकने देवेगौडांना अपार प्रेम दिले, मुख्यमंत्री बनवले. स्वप्नातही नसताना देवेगौडा पंतप्रधान बनले. कुमारस्वामी नावाचे देवेगौडांचे चिरंजीवही कालौघात मुख्यमंत्री बनले, मात्र आता त्याच देवेगौडांना ‘राजकीय अस्तित्वा’साठी झगडावे लागत आहे. राजकारणातील सत्ता कोणासाठीच ‘अमरपट्टा’ नसते हाच देवेगौडा प्रकरणातील बोध आहे. कर्नाटकच्या आखाडय़ात सिद्धरामय्या नावाच्या कुरुबा जमातीतील एका होतकरू तरुणाला राजकारणाची बाराखडी’ ज्या हरदनहळ्ळी देवेगौडांनी शिकवली तेच सिद्धरामय्या आज देवेगौडांपुढे ‘राजकीय संकट’ म्हणून उभे ठाकले आहेत. गुरू-शिष्याच्या या मुकाबल्यात कोणाची सरशी होणार हे यथावकाश कळेलच.