दिल्ली डायरी : रावांच्या ‘नथी’तून काँग्रेसविरोधाचा ‘तीर’

>> नीलेश कुलकर्णी 

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवून दिली. ही खळबळ शांत होत नाही तोच विधानसभेच्या 119 पैकी 105 उमेदवारांची यादी तयार करून त्यांनी राजकीय धुरिणांना बुचळक्यात पाडले. विधानसभेचे नऊ महिने शिल्लक असताना सत्तेचा हा ‘डाव’ लावण्यामागे राव यांचे धूर्त राजकारण लपले आहे. देशभरात सध्या मोदी सरकारविरोधात वातावरण आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडच्या निवडणुकीत भाजपाची धूळदाण उडणार असे सर्व्हे आहेत. अशावेळी जनता अजूनही काँग्रेसला ‘स्वीकारण्या’स तयार नाही हे दाखविण्यासाठी चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्रसमितीच्या ‘नथी’तून काँग्रेसविरोधाचा तीर चालविण्याची खेळी भाजपातील चाणक्यांनी केली आहे.  

तेलंगणा या स्वतंत्र राज्याची निर्मिती काँग्रेसने केली तर तेलंगणा राष्ट्रसमिती त्या पक्षात विलीन करू असा शब्द विद्यमान मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पूर्वी दिला होता. काँग्रेसने ते वचन राजकीय किंमत मोजून पाळले खरे, मात्र आज हेच चंद्रशेखर राव ‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सर्वात मोठे विदूषक असून तेच आमच्यासाठी मोठी ऍसेट’ आहेत’ अशी भाषा करीत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टनुसार तेलंगणात राजकीय घडामोडी घडत आहेत.

तेलंगणामध्ये शेतकर्‍यांसाठी ‘केसीआर रायदू बंधू’ तसेच महिलांसाठी ‘भातुकम्मा साडी’ या योजना दणदणीतपणे राबवून चंद्रशेखर राव यांनी अफाट लोकप्रियता मिळवली आहे. त्यांनी शेतकर्‍यांसाठी राबविलेल्या योजनांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुक झाले आहे. काँग्रेसशी दगलबाजी करून का असेना त्यांनी आपले प्रशासन कौशल्य सिद्ध केले आहे. देशभरात भाजपाचा ‘विकास गांडो थये छे’ अशी परिस्थिती असताना एकमेकांपासून विभक्त झालेल्या तेलंगणा व आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये मात्र विकासाची जबरदस्त स्पर्धा आहे. हैदराबादसारखे ‘हॅपनिंग प्लेस’ दिमतीला असल्यामुळे चंद्रशेखर राव यांना त्याचाही फायदा मिळाला. मात्र हे सर्व सुखेनैव सुरू असताना मुदतीपूर्वी विधानसभा बरखास्त करण्याची बुद्धी चंद्रशेखर रावांना का सुचली, असा प्रश्न निर्माण होतो. राज्याच्या राजकारणात काँग्रेसला पुनरागमनाची संधीही तयार होऊ न देणे हे त्यामागचे डावपेची राजकारण आहे. 2019 मध्ये दिल्लीत खिचडी सरकार सत्तेवर आल्यास स्वतः दिल्लीत जाऊन आपले चिरंजीव तारक रामा राव यांचा मुख्यमंत्रीपदी राज्याभिषेक करायचा आणि आपले बस्तान राजधानीत बसविण्याचा चंद्रशेखर राव यांचा मानस असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत चंद्रशेखर रावांचे ब्रँडिंग करणार्‍या मोठमोठ्या जाहिराती त्याचेच निदर्शक मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर चंद्रशेखर रावांनी राजीनामा दिल्यामुळे यामागचे ‘अंतःस्थ सूत्रधार’ कोण हेही स्पष्ट आहे. येनकेनप्रकारेण काँग्रेसला जनता स्वीकारत नाही हे दाखविण्यासाठी तेलंगणाचे राजीनामा नाट्य घडवून आणण्यात आले आहे. ज्योतिषावर गाढा विश्वास असलेले राव 6 तारीख हे स्वतःसाठी लकी मानतात. याच दिवसाचा मुहूर्त पकडून त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला  खरा, मात्र हा सहाचा आकडा त्यांना फळफळतो की सहा दुणे होत त्यांचे राजकीयदृष्ट्या ‘बारा’ वाजतात ते यथावकाश कळेलच.

कमलनाथ यांचीगोशाळा

काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुइझममुळे प्रत्येक ठिकाणी भाजप अडचणीत येत असल्याचे चित्र आहे. ‘हिंदुत्वाचे आम्हीच ठेकेदार’ अशी भाजपची भूमिका असली तरी ती बोटचेपी व संधीसाधू असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. देशातील तमाम हिंदूंची उपेक्षा झाल्यानेच 2014 मध्ये काँग्रेसचे राज्य गडगडले असा रिपोर्टच ए. के. अँथोनी समितीने दिला होता. त्यानंतर काँग्रेसधुरिणांनी आपल्या ‘पापाचे प्रायश्चित्त’ म्हणून हिंदुत्वाचा सौम्य राग आळवायला सुरुवात केली. राहुल गांधींनी गुजरातच्या निवडणुकीत केलेला देवधर्म आणि नुकतीच केलेली कैलास मानसरोवराची यात्रा चर्चेत असताना मध्य प्रदेशात काँग्रेसच्या कमलनाथांनी भाजपची चांगलीच अडचण केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास मध्य प्रदेशातील प्रत्येक पंचायतीमध्ये गोशाळा उभारू अशी घोषणा करून कमलनाथ यांनी भाजपाची झोप उडवली आहे. ‘भाजपवाले नुसतेच गाय गाय करतात, प्रत्यक्षात गाईंसाठी त्यांनी काहीही केलेले नाही. मी खरा गोभक्त असून गोशाळेचे वचनच मी देतो’, असे सांगत कमलनाथ मतांची बेगमी करत आहेत. गोमांसाच्या मुद्द्यावरून कथित गोरक्षकांचे हल्ले आणि भाजपच्या कार्यकाळातच गोमांसाच्या विक्रीत झालेली वाढ या भाजपच्या गोनीतीवर चिडून की काय गुजरातेत एका गोमातेने भाजपच्या माजी खासदाराला आपटले. आता कमलनाथ यांची गोशाळा भाजपला कितपत महागात पडते हेही लवकरच समजेल.

लालूप्रसादांची कैफियत!

एकेकाळी ज्यांनी ‘ए बबुआ’ असे म्हटले तरी राज्यभर खळबळ उडायची, ज्यांच्या कारभारावर अपहरणसारखे सिनेमे निघाले, अख्खा बिहार ज्यांच्या इशार्‍यावर नाचायचा असे राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू यादव सध्या भलतेच हतबल झाले आहेत. ‘घर फिरले की घराचे वासे फिरतात’ या म्हणीचा प्रत्यय लालू घेत आहेत. रेल्वे घोटाळ्यामुळे सुरू असलेला तुरुंगवास, तेजस्वी व तेजप्रताप या दोन चिरंजिवांनी परस्परांवर उगारलेल्या समशेरी, लोकप्रियता आणि राजकीय वर्चस्वाला लागलेली ओहोटी हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत असताना लालूंना सध्या तब्येतीचाही त्रास जाणवू लागला आहे. कडाक्याच्या थंडीत तुरुंगवास झाल्यानंतर लालूंनी भरकोर्टात ‘हुजूर बहोत ठंड लग रही है’ अशी दरख्वास्त न्यायालयापुढे केली होती. त्यानंतरही लालूंमागची संकटे कमी होताना दिसत नाहीत. तब्येतीच्या कारणावरून लालूंना तुरुंगातून रांचीच्या ‘रिम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिथे रात्रभर भुंकणार्‍या कुत्र्यांनी आणि डासांनी लालूंची झोप उडवली. ‘या त्रासामुळे मी हैराण असून मला पेइंग वॉर्डात हलवा’ असे आर्जव करण्याची वेळ लालूंवर आली आहे. लालूंची अशी ‘केविलवाणी’ अवस्था झालेली असतानाही त्यांचे विरोधक मात्र या विषयावरूनही राजकारण करण्यात मग्न आहेत. आज जो त्रास तुम्हाला जाणवत आहे तसाच त्रास जनतेने तुमच्या राजवटीत अनुभवला आहे. तुमच्या राजवटीत सामान्य जनता सुखाने झोपू शकली नाही याची आठवण विरोधक त्यांना करून देत आहेत. ‘बोए पेड बबूल का तो आम कहां से आए?’ असा सवाल विरोधक लालूंना विचारत आहेत.

[email protected]