नितीशबाबूंचे ‘टू बी ऑर नॉ टू बी’

>>नीलेश कुलकर्णी<<

[email protected]

शेक्सपियरच्या हॅम्लेटला पडलेला टू बी ऑर नॉट टू बीहा प्रश्न सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशबाबूंना पडला आहेएकीकडे बिहारी राजकारणाचा नवा अंक रंगात आलेला आहे आणि दुसरीकडे मोदी सरकारच्या लोकप्रियतेचे बुरुज ढासळत आहेत. तेव्हा भाजपसोबतचे युतीचे सोवळे कोसी नदीत बुडवून पुन्हा धर्मनिरपेक्षतेचा पंचानेसावा की कसे? या गहन प्रश्नाचे उत्तर शोधण्यात सध्या नितीशकुमार गढून गेले आहेत. नितीशकुमार यांनी गेल्या चार वर्षांत माझे सत्तेचे प्रयोगहे नाटक बिहारात वेगवेगळय़ा ढंगात सादर केले आहे. त्यामुळे २०१९ मध्ये आपली नेमकी भूमिका काय याचाच त्यांना विसर पडण्याची शक्यता आहे.

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष  असलेल्या  बिहारमधील लोकसमता पक्षाचे साथी आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या बेतात आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नोटाबंदी म्हणजे फुसका बार होता असा फटाका वाजवून राजकीय वर्तुळाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. एकेकाळी नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून देशाच्या राजकारणात नितीशकुमारांकडे पाहिले जात होते. मात्र ‘पीएम मटेरियल’ असलेल्या नितीशकुमार यांनी नंतरच्या काळात अशा काही कोलांटउडय़ा मारल्या की, आज ते स्वतःची ओळख हरवून बसले आहेत. लालू व काँग्रेससोबत आघाडी करून पंतप्रधानपदाचे हुकलेले बाशिंग त्यांना पुन्हा एकदा बांधून घ्यायचे असले तरी लालूपुत्र तेजस्वी यादवांच्या विरोधामुळे त्यांचा या तथाकथित धर्मनिरपेक्ष आघाडीत प्रवेश होण्याची शक्यता सध्या तरी धुसर आहे. त्याच विवंचनेत असलेले नितीशकुमार ‘साथी हाथ बढाना’ अशी आर्त हाक देत आहेत, पण तूर्त कोणी त्यांना साथ देताना दिसत नाही.

पाटण्यात गुरुवारी झालेल्या एनडीएच्या भोजनावळीला दांडी मारून केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी आपली नाराजी दाखवून दिली आहे. ज्या बैठकीला पंतप्रधान व भाजप अध्यक्ष नसतील ती कसली एनडीए बैठक, असे म्हणत कुशवाह यांनी नितीशबाबूंच्या पक्वान्नांवर राग काढला. वास्तविक अमित शहांच्या जोडी ब्रेक राजकारणामुळे लालू-नितीश हे जयप्रकाशांचे शिष्योतम वेगळे झाले. त्यातच लालू थेट जेलमध्ये गेल्यानंतर बिहारचे रान आपल्याला मोकळेच झाले अशा आनंदात भाजपवाले आणि त्यांचे नवे भिडू नितीशबाबू होते, मात्र झाले उलटेच. लालूंच्या तुरुंगवासामुळे त्यांच्या कुटुंबीयांना फुकटची सहानुभूती मिळाली. त्यात लालूपुत्र तेजस्वी यांनी विरोधी पक्षनेते म्हणून तर नितीश सरकारला सध्या सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळेच ‘नितीश अंकल का मै बहोत आभारी हूँ. जिनके कारण मुझे नेता विपक्ष बनने का और खुद को साबित करने का मौका मिला’ असे टोले लगावत तेजस्वी नितीशबाबूंच्या डोक्याचा ‘हेडॅक’ बनले आहेत. लालूंसोबतची आघाडी तोडून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर नितीशकुमारांनी तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. ही बाब तेजस्वी यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे आणि हीच बाब नितीशबाबूंच्या धर्मनिरपेक्ष आघाडीमधील पुनर्पवेशाबाबत मोठा अडथळा ठरणार आहे. यादव झाले, कुर्मी झाले, आता आठ टक्के लोकसंख्या असलेल्या कोरई (कुशवाह) समाजाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली पाहिजे असे म्हणत एकेकाळी नितीशकुमारांनी राजकारण शिकवलेले उपेंद्र कुशवाहदेखील नितीश यांना आव्हान देत आहेत. कुशवाह यांच्या या ‘हेलिकॉप्टर शॉट’मागे भाजपवाल्यांची फूस असल्याचा संशय नितीशबाबूंना आहे. मात्र भाजपसोबत राहिले तरी भविष्यात मुख्यमंत्रीपद मिळणे अशक्य आणि विरोधी पक्षात गेले तरी अशक्य अशा विचित्र कोंडीत नितीशकुमार अडकले आहेत. दोन्ही बाजूंनी किनारा दूर असलेल्या पूरग्रस्त कोसी नदीत अडकलेल्या माणसासारखी नितीशबाबूंची सध्या अवस्था झाली आहे.

कपिलदेव आणि राज्यसभेचा षटकार

kapil-dev

भाजप नेतृत्वाचा जनतेशी संपर्क आणि संबंध तुटला असला तरी ‘संपर्क फॉर समर्थन’ अशा मोहिमेद्वारे त्या पक्षाचे वरिष्ठ नेते सध्या अनेक सेलिब्रेटींच्या घरी आगंतुक पाहुण्यासारखे अवतरत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हिंदुस्थानला पहिला विश्व करंडक मिळवून देणारे माजी क्रिकेट कर्णधार कपिलदेव यांच्याकडे गेले. कपिल यांनी त्यांची लस्सी, पराठा, छांस अशी मेहमाननवाजीही केली. यावेळी चतुर अमितभाईंनी हळूच कपिलदेवांना चंदिगडमधून लोकसभा लढविण्याची गळ टाकली. तेथील भाजपच्या विद्यमान खासदार किरण खेर यांच्या बेताल विधानांमुळे भाजप अनेकदा अडचणीत आला आहे. त्यामुळे तिथे पक्षाला सक्षम उमेदवार हवा आहे. शहा यांनी त्यादृष्टीने चाचपणी केली खरी, मात्र कपिल यांच्या काही भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहेत. यापूर्वीही काँग्रेस आणि भाजपने त्यांना राजकारणात ओढण्याचा भरपूर प्रयत्न करून पाहिला. मात्र कपिलदेव यांनी दर वेळी अशा गुगली मैदानाबाहेर टोलवल्या. कपिल यांचे खास दोस्त कीर्ती आझाद भाजपकडून पहिली निवडणूक लढवत असताना कपिल यांना प्रचाराची गळ घालण्यात आली होती. त्यावेळी कपिल यांनी कीर्ती हा माझा मित्र असला तरी आपण भाजपचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. चंदिगडचा प्रस्ताव बारगळल्यानंतर कपिलला राष्ट्रपती नियुक्त खासदार करणार असल्याची पुडी सोडून देण्यात आली आहे. अर्थात ती नियुक्ती राजकीय नसल्यामुळे कपिलदेव विरोध करू शकणार नाही हेही खरेच.

खट्टरांचा जिझिया कर

manohar-lal-khattar-haryana

योगी आदित्यनाथ आणि मनोहरलाल खट्टर हे भाजपचे दोन मुख्यमंत्री आपल्या कारभारामुळे अधूनमधून प्रकाशझोतात येत असतात. त्यातही खट्टरांच्या गाठीशी अशी कामगिरी अधिक आहे. मनरेगाच्या कामावेळी एका खड्डय़ात पाणी आढळून आल्यानंतर ‘यही तो है सरस्वती नदी’ असा साक्षात्कार त्यांना झाला होता. त्याच खट्टर यांनी ‘जिझिया करा’लाही लाजवेल असा कर खेळाडूंकडून वसूल करण्याचे फर्मान मध्यंतरी काढले. त्यामुळे क्रीडा जगतात संतापाची लाट उसळली. वास्तविक, पंजाब आणि हरयाणातील आजवरच्या राज्यकर्त्यांनी या राज्यांची क्रीडा पार्श्वभूमी लक्षात घेता खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवनव्या योजना राबविल्या. हरयाणात देविलाल, बन्सीलाल, भजनलाल ते भूपेंद्र हुडा तर पंजाबात प्रकाशसिंग बादल, कॅप्टन अमरिंदर यांनी देदीप्यमान कामगिरी करणाऱया खेळाडूंना थेट पोलिसात डीवायएसपीची पोस्ट देऊन त्यांचा सन्मान वाढवला आहे. त्यामुळेच हरभजनसिंग पंजाब पोलिसात तर जोगिंदर शर्मा हरयाणा पोलिसात वरिष्ठ पदे भूषवताना दिसतात. इतकेच नाही तर बॉक्सर विजेंद्रकुमार, कुस्तीपटू सुशीलकुमार, योगेश्वर दत्त, गीता फोगाट व बबिता या पोलीस दलात कार्यरत आहेत. या पद्धतीने प्रोत्साहन देण्याऐवजी खट्टर महाशयांनी या खेळाडूंच्या व्यावसायिक कमाईमधील एक तृतीयांश रक्कम ‘राज्य खेल परिषद’मध्ये जमा करण्याचे  फर्मान काढले. साहजिकच त्यावर सडकून टीका झाली. अनेक खेळाडूंनी  ट्विटरवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रारींचा पाऊस पाडल्यानंतर त्यांनी खट्टर यांचे कान टोचले. त्यानंतर त्यांनी ते तऱहेवाईक फर्मान मागे घेतले. मात्र जो बूंद से गयी वो हौद से नही आती, हे खट्टर महाशयांना कधी समजणार आहे?