निळंवडे धरणातून पिण्यासाठी पहिले आवर्तन सुटले

सामना प्रतिनिधी । संगमनेर

निळवंडे जलाशयातून मंगळवारी दुपारी ४ वाजता १२०० क्युसेक्सने पिण्यासाठीचे पहिले आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. हे आवर्तन सोमवारी सायंकाळी सोडण्यात येणार होते. मात्र, गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे आवर्तन आज सोडण्यात आले आहे.

भंडारदरा जलाशयात ११ हजार २६ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून, निळवंडे जलाशयात पाणी सोडतेवेळी ८११४ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. हे आवर्तन पिण्यासाठी असून, श्रीरामपूरपर्यंत पाणी पोहोचल्यानंतर आवर्तन बंद होणार आहे. त्यासाठी किमान ४ दिवसांचा अवधी लागणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे. निळवंडे जलाशयाच्या गेटला गेली दोन वर्षांपासून तांत्रिक बिघाड झाला असून, हायड्रो इलेक्ट्रिक विभाग, मॅकेनिक गेट, नाशिक डिव्हिजन व कन्स्ट्रक्शन विभाग संगमनेर यांच्या अधिपत्याखाली ही यंत्रणा कार्यरत आहे. सतत बिघाड होत असल्याने एखादे गेट कायमचे बंद किंवा कायमचे चालू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.