संभाजीनगरात अवैध वाहतुकीचे ९ बळी

1

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहरासह महामार्गावर धुमाकूळ घालणाऱ्या अॅपे रिक्षाने आज शुक्रवारी ९ जणांचे बळी घेतले. संभाजीनगर-पैठण रोडवरील गेवराई तांडय़ानजीक पाण्याचा टँकरला अॅपे रिक्षाची समोरासमोर टक्कर झाली. यामध्ये ९ जण ठार झाले. हा अपघात एवढा भीषण होता की अॅपे रिक्षाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. दरम्यान, या अपघातामुळे अवैध वाहतूक आणि अॅपेवाल्यांचा धुमाकूळ हे दोन्ही मुद्दे ऐरणीवर आले आहेत.

सायंकाळच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथून प्रवासी कोंबून बिडकीनच्या दिशेने भरघाव निघाला. रस्त्यात प्रवाशांची चढउतार करीत रिक्षा चितेगावहून निघाली. दरम्यान गेवराई तांडय़ानजीक समोरून येणारा पाण्याचा टँकर आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात ९ जण जागीच ठार झाले. यामध्ये चितेगाव, बिडकीन व पांगरा येथील रहिवाशांचा समावेश आहे.