लातूरच्या एमआयडीसीत ९ कामगारांचा गुदमरुन मृत्यू

सामना ऑनलाईन । लातूर

लातूर एमआयडीसीतील किर्ती ऑईल मिल कंपनीत टाकी साफ करतेवेळी विषारी वायूची गळती झाल्यामुळे गुदमरुन नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. सोमवारी, ३० जानेवारी रोजी घडलेल्या या दुर्घटनेची चौकशी करुन दौषींवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

किर्ती ऑईल मिल खाद्यतेल तयार करते. या प्रक्रियेत निर्माण होणारे टाकाऊ द्रव्य एका टाकीत जमा केले जाते. नंतर प्रक्रिया करुन बाहेर सोडले जाते. यासाठी कंपनीच्या आवारात सहाशे चौरसफुटाची २० फूट खोल अशी टाकी बसवण्यात आली आहे. दर महिन्याला या टाकीची सफाई केली जाते. सोमवारी हेच काम सुरू असताना विषारी वायूची गळती झाल्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.