नीरव मोदीला जामीन देण्यास यूके हायकोर्टाचा नकार

40

सामना ऑनलाईन, लंडन

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आणि प्रख्यात हिरे व्यापारी नीरव मोदी याला जामीन देण्यास लंडन हायकोर्टाने आज नकार दिला. जामिनावर मुक्तता केल्यास मोदी पुन्हा पोलिसांना शरण येणे अशक्य बाब आहे ही कनिष्ठ न्यायालयाने व्यक्त केलेली भीती रास्तच आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या मताशी आपण सहमत आहोत. म्हणूनच आपणही नीरव मोदीला जामीन मंजूर करू शकत नाही, असे लंडन येथील रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायमूर्ती इग्रीड सिमलेर यांनी नमूद केले.

एवढेच नव्हे तर, मोदी याला जामीन दिल्यास त्याच्याकडून न्यायदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याची तसेच साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची दाट शक्यता आहे, असे स्पष्ट मतही न्यायमूर्ती सिमेलर यांनी व्यक्त केले. पंजाब नॅशनल बँक घोटाळा तसेच मनी लॉण्डरिंगप्रकरणी हिंदुस्थानला हवा असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी लंडन येथील तुरुंगात खितपत पडलेला असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे.

तुरुंगात असताना त्याने यापूर्वी तीन वेळा कनिष्ठ न्यायालयाकडून जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु तीनही वेळा त्याचा जामीन अर्ज वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळून लावला. मोदी याला जामीन देणे ही फार मोठी रिस्क आहे. तसेच जामिनासाठी त्याने देऊ केलेली सिक्युरिटीदेखील पुरेशी नाही, असेही वेस्टमिनिस्टर कोर्टाचे म्हणणे होते. हायकोर्टानेही या मुद्यावर विश्वास ठेवून मोदीला जामीन नाकारला.

आपली प्रतिक्रिया द्या